प्रेमकथापटांचा ठरीव करण जोहर फॉम्र्युलाचा चित्रपट म्हटला की दिग्दर्शकाला फारसा वाव देण्याचं काही कारणच उरत नाही. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ मध्ये तरुणाईला साद घालू शकेल अशी प्रेमकथा नाहीच, परंतु एकाहून एक सरस गाणी आणि रणबीरभोवती सिनेमा फिरत राहतो. त्यामुळे त्याचा ‘यूथ टच’ देत दिग्दर्शकाने ‘घिसापिटा’ डीडीएलजे फॉम्र्युला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शकाचीच कथा-पटकथा असली तरी करण जोहरचा सिनेमावरचा पगडा स्पष्टपणे पडद्यावर दिसत राहतो. सबकुछ रणबीर कपूर असेही तीन शब्दांत चित्रपटाचे वर्णन करता येईल.
कबीर ऊर्फ बनी (रणबीर कपूर) स्वच्छंदी तरुण, अवी (आदित्य रॉय कपूर) आणि अदिती (कल्की कोचलिन) या आपल्या जिवलग मित्रमैत्रिणीसोबत मनालीला पिकनिकला जातो. आपल्या डॉक्टरकीच्या अभ्यासातून मोकळेपणा मिळावा म्हणून नयना (दीपिका पदुकोण)सुद्धा मनाली पिकनिकच्या चमूत सामील होते. बनीच्या ग्रुपमध्ये नयना सामील होते आणि मनालीच्या सहलीदरम्यान बनीच्या प्रेमात पडते, पण त्याला सांगू शकत नाही. मनमुराद मनाला वाटेल तसे दिलखुलासपणे जगणे, जगभर फिरणे हे बनीचे स्वप्न आहे. ते साकारायला तो निघून जातो. नंतर एकदम आठ वर्षांनी अदितीच्या लग्नाच्या निमित्ताने हे चार मित्र-मैत्रिणी भेटतात आणि धमाल करतात. पण कॉलेजमध्ये शिकत असतानाचे स्वभाव चौघांचेही बदललेत, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललाय. आता तरी दुसऱ्यांदा भेटल्यानंतर तरी नायिका-नायकाविषयी आपले प्रेम व्यक्त करते का असे प्रेक्षकाला वाटत राहते. खरे तर शेवटच्या १५-२० मिनिटांतच सिनेमाचा मूळ विषय प्रेमकथेच्या जवळ जातो.
अदितीचे लग्न म्हणजे डीडीएलजे किंवा तत्सम प्रकारच्या आठवडाभराच्या लग्नसोहळ्यातली पंजाबी स्टाईलची मजा बघताना प्रेक्षक रमतो, पण हे तर सगळे आपण अनेकदा पाहिल्याचे सहजच लक्षात येते. त्यामुळे रूढार्थाने सरळसोटपणे दोन प्रेमी जिवांची भेट घडवून न आणण्याचा थोडासा वेगळेपणा दिग्दर्शकातील लेखकाने केला असला तरी अतिशय संथ पद्धतीने केलेली मांडणी, संकलनाला कात्री लावण्याची गरज न ओळखता लांबलेली दृश्ये यामुळे मध्यंतरानंतर सिनेमा रटाळ वाटतो. तरीही बॉलीवूडी करण जोहर फॉम्र्युलानुसार गाणी, तरुणाईची थोडीफार धमाल, नृत्याविष्कार यामध्ये प्रेक्षक काहीसा रमून जातो. परंतु, बाकी सारे सरधोपट, बॉलीवूडी-पंजाबी लग्नसोहळ्याच्या वळणाने होत राहते, त्यामुळे प्रेक्षकाला उत्सुकता राहत नाही. ‘..आणि ती दोघं सुखाने संसार करू लागली’छाप सिनेमा नसला तरी रणबीरला अधिक वाव, त्या तुलनेत दीपिकाला अगदी मोजकाच वाव देणारा हा सिनेमा सबकुछ रणबीर आणि त्याची गाणी एवढय़ापुरताच लक्षात राहतो.
माधुरी दीक्षितचे नृत्य बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकाला आपण पहिल्यांदा दाखविले हेच जणू काही करणला दाखवायचे होते. एका नृत्यापुरती माधुरी सिनेमात असली तरी त्याचा कथानकाशी तिळमात्र संबंध नाही. एकेकाळच्या बॉलीवूड टॉप हिरॉईनने एका आयटम साँगपुरता सिनेमा स्वीकारावा याचे मात्र प्रेक्षकाला आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.
रणबीर-दीपिका, कल्की, आदित्य रॉय कपूर यांचा अभिनय भूमिकांना साजेशा झाला आहे. ‘कॉकटेल’मधील ‘व्हेरोनिका’च्या एकदम भिन्न स्वभावाची नयना तलवार संयत पद्धतीने साकारण्यात दीपिका यशस्वी ठरली आहे. आपल्या पडद्यावरच्या वावरातून आणि उच्छृंखल, उत्फुल्ल तरुणाईची छटा अभिनयातून दाखविण्यात रणबीर यशस्वी ठरतो. ‘साँग अ‍ॅण्ड डान्स’ या बॉलीवूड फॉम्र्युलाचा सरधोपट आणि करण जोहरच्या प्रभावाखालील प्रेमकथापट असेही या सिनेमाचे वर्णन करता येईल.
ये जवानी है दिवानी
निर्माते- हिरू यश जोहर, करण जोहर
कथा-पटकथा-दिग्दर्शन- अयान मुखर्जी
संगीत- प्रीतम
छायालेखन- व्ही. मणिकंदन
संकलन- अकीव अली
कलावंत- रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, आदित्य रॉय कपूर, कल्की कोचलिन, फारुख शेख, तन्वी आझमी, एव्हलिन शर्मा व अन्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा