‘माझा पुरस्कार’, ‘असेही एक नाटय़ संमेलन’, ‘एकत्र कुटुंब – सुखी कुटुंब संमेलन’, ज्येष्ठ रंगकर्मीचे ‘भेटी लागे जीवा’ संमेलन असे आगळे कार्यक्रम आयोजित करणारे अशोक मुळ्ये मराठी नाटय़सृष्टीत ‘मुळ्ये काका’ या नावाने परिचित आहेत. याच मुळ्ये काकांनी १२ नोव्हेंबर रोजी ‘असेही एक साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे. संमेलनात चित्रवाहिन्या आणि चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद लिहिणारे लेखक, वृत्तपत्रातून स्तंभलेखन करणारे कलाकार, व्यंगचित्रकार, वृत्तनिवेदक, ‘एफएम रेडिओवरील मराठी रेडिओ जॉकी आदी मंडळी सहभागी होत आहेत.
कार्यक्रमाची संकल्पना, आयोजन मुळ्ये यांचेच असून त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी लेखी निमंत्रण पत्रिका नसते. मुळ्ये काकांचे फोनवरून केलेले आमंत्रण आणि वैयक्तिक संपर्काच्या जोरावर ही मान्यवर मंडळी कार्यक्रमात सहभागी होत असतात. साहित्य संमेलनासाठी मुळ्ये काका यांनी आपली स्वत:ची ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे.
छोटय़ा व मोठय़ा पडद्यावरील लेखक, व्यंगचित्रकार, स्तंभलेखक, कलाकार आदींचे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. परंतु त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अपवाद वगळता म्हणावे तेवढे स्थान दिले जात नाही. त्यामुळे या सर्व मंडळींचे एकत्रित स्नेहसंमेलन करावे या उद्देशाने हे ‘असेही एक साहित्य संमेलन’ आयोजित केले आहे, असे मुळ्ये काकांनी सांगितले.माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आणि ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘फू बाई फू’ आणि ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या कार्यक्रमाची लेखक मंडळी, कवी आणि गीतकार अरुण म्हात्रे, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक समृद्धी पोरे, व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, श्रीनिवास प्रभुदेसाई, विवेक मेहेत्रे, वृत्तपत्रातून स्तंभलेखन करणारे शुभांगी गोखले, अमृता सुभाष, संजय मोने हे कलाकार लेखक, दूरदर्शन व वृत्तवाहिन्यांवरील वृत्तनिवेदक, एफएम रेडिओवरील मराठी रेडिओ जॉकी अर्थात निवेदक आणि या क्षेत्रातील अन्य मान्यवर मंडळी संमेलनास उपस्थित राहणार आहेत. या सगळ्यांनी एकत्र जमावे, गप्पा माराव्यात, एकमेकांना भेटावे, असा विचार असल्याचे मुळ्ये यांनी सांगितले.
दादर-माटुंगा कल्चर सेंटर, दादर (पश्चिम) येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणारे हे संमेलन फक्त निमंत्रितांसाठीच असल्याचे स्पष्ट करून मुळ्ये म्हणाले की, स्वागत, अल्पोपहार, उद्घाटन सोहळा, भोजन आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असे या साहित्य संमेलनाचे स्वरूप आहे. संमेलनाच्या व्यासपीठाची देखणी आणि कल्पक सजावट ‘समर्थ डेकोरेटर्स’चे गजानन राऊत यांची आहे. विविध दूरदर्शन मालिकांच्या पाच हजारांहून अधिक भागांचे लेखन करणाऱ्या रोहिणी निनावे तसेच प्रशांत लोके व आशिष पाथरे या लेखकांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा