खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशाचा सोहळा उद्या सोमवार दि. २४ रोजी इच्छामणी मंगल कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, चिटणीस शौर्यराज वाल्मीकी आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  यांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात शिवसैनिकांनी व दलित कार्यकर्त्यांनी गोंधळ करू नये म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज कार्यक्रमस्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आधिका-यांशी चर्चा केली. या वेळी  जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आमदार भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते. मेळाव्यास काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून राष्ट्रवादीला मात्र निमंत्रण देण्यात आलेले नाही. मेळाव्यास काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे म्हणून मोटार गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी विखे, ससाणे, कांबळे यांनी बैठका घेतल्या. खंडकरी शेतक-यांचे जमीन वाटप रखडल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. त्याची गंभीर दखल घेऊन आंदोलकांशी ससाणे यांनी चर्चा केली. आता मंगळवार दि. २५ रोजी मुंबईत बठक आयोजित करण्यात आली आहे.
खासदार वाकचौरे यांच्या पक्षांतरामुळे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. सेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी पदाधिका-यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत वाकचौरे यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उद्याच्या मेळाव्यात काही घडू नये, म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षिका सुनीता साळुंके-ठाकरे, उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी आज बंदोबस्ताचे नियोजन केले. आंदोलकांना कार्यक्रमस्थळापासून रोखण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर नोटिसा बजावण्यात येणार आहेत. रात्री उशिरा या कारवाईला प्रारंभ झाला. अधीक्षक शिंदे हे शहरात ठाण मांडून आहे. मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेले कोबिंग ऑपरेशन हा त्याचाच एक भाग होता. काँग्रेसच्या नेत्यांनी पोलिसांना गोंधळ होणार नाही. याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.
पक्षप्रवेशाचा सोहळा बंदिस्त सभागृहात होणार असून जाहीर सभा घेण्याचे टाळण्यात आले आहे. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी वाकचौरे यांच्या प्रचाराचा आपण नारळ फोडत आहोत, असे एका कार्यक्रमात जाहीर केले होते. पण राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी त्यास विरोध दर्शविला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाशिवाय वाकचौरे यांच्या प्रचारात सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यास महसूलमंत्री थोरात, कृषीमंत्री विखे व ससाणे यांनी पिचड यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले होते. पण आता पिचड हे कार्यक्रमास अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याला आता केवळ काँग्रेसचाच मेळावा असे स्वरूप देण्यात आले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये अद्यापही वाकचौरेंच्या उमेदवारीवरून तणाव आहे. तो मिटविण्याचे जोरदार प्रयत्न आहेत. राष्ट्रवादीचे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नेते शंकरराव कोल्हे, प्रसाद तनपुरे, यशवंतराव गडाख, आमदार शंकरराव गडाख, भानुदास मुरकुटे यांनी वाकचौरे यांच्या प्रवेशाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पिचड यांनी घाई केली होती. पण आता तेदेखील चार पाऊले मागे आले आहेत. पवार यांनी आदेश दिला तरच वाकचौरेंना निवडून आणू, अशी भूमिका आता पिचड यांनी घेतली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पिचड यांच्याशी समझोता केला होता. ही खेळी अंगलट आली असून राष्ट्रवादीने तूर्तास तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. राज्य पातळीवरील भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच राष्ट्रवादी पुढील राजकीय धोरण घेणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार हे जिल्ह्यात दि. २८ रोजी येत आहेत. त्या वेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा होईल.
दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर व नेवासे हे पाच विधानसभा मतदारसंघ आघाडीच्या ताब्यात आहेत. कोपरगावमध्येही आघाडी तुल्यबळ आहे. अशा स्थितीत विद्यमान खासदार वाकचौरे काँग्रेसमध्ये आल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी स्पष्ट केले.  
मेळाव्यास काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन ससाणे, कांबळे, आमदार सुधीर तांबे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनीता भांगरे, सेवादलाचे केशवराव मुर्तडक, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे, नगराध्यक्ष राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, पक्षप्रतोद संजय फंड, बाजार समितीचे सभापती दीपक पटारे, सचिन गुजर यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा