रेल्वे फलाट आणि गाडीचा फूटबोर्ड यांच्यातील जीवघेण्या पोकळीमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य प्रवाशांना एकमागोमाग जीवघेण्या अपघातांना सामोरे जावे लागत असताना मुंबई तसेच ठाणे परिसरातील बहुतांश खासदार या विषयावर मौनीबाबा बनल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दिल्लीत वीज स्वस्त होताच मुंबईत खासगी कंपन्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून शायिनग आंदोलने करण्यात आघाडी घेणारे काही खासदार मुंबई आणि आसपासच्या परिसरातील रेल्वे स्थानकांमध्ये सातत्याने घडणाऱ्या अपघातांविषयी गप्प का, असा सवाल प्रवासी संघटनांमधून उपस्थित केला जात आहे.
मुंबई, ठाणेकरांची लाइफ लाइन मानल्या जाणाऱ्या रेल्वे सेवेतील विविध समस्यांची दुखणी काही नवी नाहीत. मध्य रेल्वे मार्गावरील काही मोजके अपवाद वगळले तर जवळपास सर्वच स्थानकांमधील फलाट आणि गाडी यांच्यातील पोकळी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ठाणेपल्याडच्या सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये गेली अनेक वर्षे हा प्रश्न प्रवाशांचे सर्वात मोठे दुखणे बनला आहे. या भागातील काही खासदारांनी हा विषय सातत्याने लावूनही धरला. मात्र रेल्वे प्रशासनाने वर्षांनुवर्षे ोप्रवाशांच्या मागण्यांना भीक घातली नाही. फलाट आणि गाडी यांच्यातील पोकळी कमी व्हावी, यासाठी खासदारही कधी फारसे आक्रमक झाल्याचे चित्र दिसले नाही. यंदा मात्र मुंबई, ठाण्यातील खासदार मंडळींच्या मौनीपणाने कळस गाठल्याने प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींमधून तीव्र अशा प्रतिक्रिया ऊमटू लागल्या आहेत.
गेल्या महिनाभरात मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या मार्गावर सातत्याने दुर्घटना घडत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात कारशेडला उभ्या असलेल्या एका लोकल गाडीस आग लागल्याने या परिसरात अफवांचा धूर उठला होता. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ या मार्गावर सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे रेल्वे प्रवासी अक्षरश: हैराण आहेत. आठवडय़ातून किमान एकदा तरी बिघाड होत असल्याने ऐन गर्दीच्या वेळेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, असा अनुभव आहे. घाटकोपर येथे फलाट क्रमांक दोनवरील खड्डय़ात पडून एका तरुणीने हात गमावल्यानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील स्थानकांमध्ये फलाटांची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत. गेली अनेक वर्षे पोकळीचा हा प्रश्न ऐरणीवर आला असताना रेल्वे प्रशासनाला उशिराने सुचलेल्या या शहाणपणाविषयी मुंबई, ठाण्यातील एकाही खासदाराने साधा ‘ब्र’ही उच्चारला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. घाटकोपर दुर्घटनेत एका तरुणीला हात गमवावे लागले, तर कुल्र्यात पोकळीत पडून तरुणाला कायमचे अपंगत्व आले. या दोन घटनांचा संदर्भ घेत मुंबईतील रेल्वे प्रश्नावरून रान पेटविण्याची संधी असताना सर्वसामान्य प्रवाशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार मात्र मौनव्रतात गेल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.

रेल्वे व्यवस्थापनाची गाडी रूळावरून घसरली
सातत्याने उशिराने येणाऱ्या लोकल गाडय़ा, अस्वच्छ प्रसाधनगृहे, प्लॅटफॉर्म आणि गाडय़ांमधील जीवघेणी पोकळी, तिकीट खिडक्यांची अपुरी संख्या, बंद पडलेली एटीव्हीएम मशिन्स, ऐन गर्दीच्या वेळी बंद पडणारी इंडिकेटर्स, रद्द होणाऱ्या गाडय़ा, सिग्नल यंत्रणेतले बिघाड, ओव्हरहेड वायर्सच्या समस्या.. अशा समस्यांना तोंड देता देता लोकल प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. रेल्वेला सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या या मुंबईच्या उपनगरीय सेवेच्या समस्या संपता संपत नाहीत. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईच्या आणि पर्यायाने मुंबईकरांच्या तोंडाला पानेच पुसली जातात आणि तो एक दिवस चर्चा करून मुंबईकर पुन्हा लोकलच्या भयंकर गर्दीत शिरून आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या वाटय़ाला लागतो. मात्र घाटकोपर येथे झालेल्या अपघाताने मुंबईकरांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या सर्वच प्रकरणाला राजकीय रंग देऊन सुंदर वातावरणनिर्मिती केली आहे. रेल्वेच्या कारभाराबाबत एकंदरीत असलेल्या असंतोषाला आता हळूहळू वाचा फुटायला लागली आहे..

Story img Loader