आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचाच खासदार होणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. अखेरच्या श्वासापर्यंत सामान्य जनता व काँग्रेस पक्ष यांच्याशी फारकत घेणार नाही, असा ठाम विश्वास खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी बुधवारी निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या व्यापक बैठकीत बोलताना व्यक्त केला. प्रदीर्घकाळ मुंबई येथे उपचार घेणारे खासदार मंडलिक प्रथमच कार्यकर्त्यांना सामोरे जाताना बोलत राहिले. त्यांचा उत्साह पाहून कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य पसरल्याचे दिसून आले. यावेळी गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना हा हमिदवाडा सहकारी साखर कारखान्याने चालविण्यास घ्यावा, अशी मागणी भूषण पाटील, आर.डी.पाटील आदींनी केली.    
खासदार मंडलिक म्हणाले, माझी प्रकृती उत्तम आहे. ५० वर्षांहून अधिक काळ माझ्यावर अकृत्रिम निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते आणि स्वाभिमानी जनता ही माझी कवचकुंडले आहेत. यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सर्व स्तरावर संघर्ष करीत वाटचाल करीत आहेत. कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, टोल हद्दपार व्हावा, थेट पाईप लाईन योजना यासाठी अग्रही असल्याचे सांगितले. हमिदवाडा कारखान्याचे संचालक पी.बी.भोसले-पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पी.जी.पाटील,नामदेवराव मेंडके, जयसिंगराव भोसले, मारूती चोथे, सुहास खराडे, एम.आर.चौगुले, जयसिंगराव घाटगे, अतुल जोशी, अर्जुन पाटील, कुंडलिक पाटील, एस.एस.पाटील, बी.डी.पाटील, भैय्या इंगळे, तुकाराम सावंत यांची भाषणे झाली. बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष केशव पाटील, बाजीराव गोधडे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, इगल प्रभावळकर, सुधाकर पाटोळे आदी उपस्थित होते. एन.एस.चौगुले यांनी आभार मानले.

Story img Loader