प्रशासकीय परिपत्रकाचे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांच्या अन्यायी करण्यात आलेल्या बदल्या रद्द कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारपासून इचलकरंजी येथे महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू झाले. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.    
या संघटनेच्या वतीने कामगारांच्या मागण्यांसाठी कार्यकारी अभियंता केशव सदाकळे यांच्याशी यापूर्वीअनेकदा चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी आदेश देऊनही त्याची कार्यवाही होत नाही. कामगारविरोधी आडमुठय़ा धोरणाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले असल्याचे संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य एम. टी. शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.    
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना व्याजासह नुकसान भरपाई मिळावी, तांत्रिक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाऐवजी तांत्रिक काम द्यावे, त्यांना जादा कामांचा मोबदला मिळावा, कामगारांना रजा रोखीकरण रक्कम मिळावी, थकबाकी वसुलीसाठी कामगारांना संरक्षण मिळावे आदी विविध मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये संघटनेचे विभागीय सचिव जयकुमार खटावणे, उपविभाग मंडल सचिव विलास शिकलगार, अरुण गावडे, पी. आर. किल्लेदार, राजाराम बनगे, बाबा नाईक, सतीश बनकर आदींचा समावेश आहे.     दरम्यान इचलकरंजी मंडल हे केवळ ९ किलोमीटर अंतराचे आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी फारशी संधी नाही. तरीही परिपत्रकानुसार काही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र संघटनात्मक कुरघोडीतून हे उपोषण करण्यात आले असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Story img Loader