प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत ‘महायुती’मुळे घडलेल्या चमत्काराची पुनरावृत्ती पुन्हा एकदा महापालिकेची आर्थिक तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत करण्याच्या दृष्टीकोनातून सत्ताधारी मनसेने मोर्चेबांधणी केली आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी २० एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे.
शिवसेनेच्या ‘जय महाराष्ट्र’मुळे महाआघाडीत फूट पडली असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादीने चाचपणी करण्याची धडपड चालविली आहे.
पालिकेत सत्ताधारी असूनही या तिजोरीच्या चाव्या गेल्यावेळी गमावाव्या लागलेल्या मनसेने स्थायी काबीज करण्यासाठी शिवसेनेची मदत घेण्याची रणनिती आखली आहे. सद्यस्थितीत स्थायीत मनसेचे पाच, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन, भाजप व काँग्रेस प्रत्येकी दोन तर अपक्ष गटाचे एक असे बलाबल आहे. शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यास मनसे व भाजपचे मिळून दहा सदस्य होतात तर विरोधकांकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष गट असे मिळून सहा इतके संख्याबळ होते. हे गृहीतक मांडून सत्ताधारी मनसेने स्थायीवर कब्जा करण्याच्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. प्रभाग समिती सभापती निवडणुकीत आकारास आलेली मनसे-भाजप-शिवसेना महायुतीद्वारे स्थायी समितीत बदल घडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रभाग समिती सभापतीपदांच्या निवडणुकीत महायुतीने सर्वच्या सर्व म्हणजे सहा प्रभाग समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले. स्थायीत मनसेचे वंदना शेळावे, अशोक मुर्तडक, रमेश धोंडगे, सुदाम कोंबडे, रेखा बेंडकुळे हे पाच सदस्य आहेत. मनसेच्या आमदारांनी मुर्तडक यांचे नांव पुढे केले असले तरी शिवसेना त्यास आक्षेप घेऊ शकते. तसेच मनसेतील काही पदाधिकाऱ्यांचा मुर्तडक यांच्या नावास विरोध आहे. या पाश्र्वभूमीवर, ऐनवेळी रमेश धोंगडे यांचे नांव पुढे केले जाईल, असे सांगितले जाते. यामुळे स्थायीच्या सभापतीपदासाठी कोणाचे नांव पुढे येते, याकडे सर्वाचे लक्ष आहे. दरम्यान, महापालिकेत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या मनसेला काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना-रिपाइंच्या महाआघाडीने गतवर्षी चांगलेच झटके दिले होते. महापालिकेच्या कारभारात विरोधकांच्या अडथळ्यांचा सामना करता करता सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आले होते. वर्षभरात घडलेल्या या घडामोडी भविष्यात त्रासदायक ठरणार असल्याने मनसेने शिवसेनेशी जुळवून घेत हे समीकरण सोपे करण्याच्या दिशेने पावले टाकली. त्याची मुहूर्तमेढ प्रभाग समितीच्या निमित्ताने रोवली गेली. दुसरीकडे शिवसेनेने साथ सोडल्यामुळे राष्ट्रवादीच्या महाआघाडीत फूट पडली आहे.

Story img Loader