पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वांद्रे ते दहिसर दरम्यान २६.१६ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग (इलेव्हेटेड रोड) बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्याचा विचार केला खरा, पण तिजोरीत खडखडाट असल्याने या प्रकल्पासाठी लागणारे सुमारे पाच हजार कोटी रुपये कसे उभारायचे अशी विवंचना महामंडळाला पडली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी राज्य सरकारचे दरवाजे ठोठावण्याचा महामंडळाचा विचार आहे.दिवसेंदिवस पश्चिम उपनगरात वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता वांद्रे येथील एस.व्ही. रस्त्यापासून दहिसपर्यंत तब्बल २६.१६ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचा ‘एमएसआरडीसी’चा मानस आहे. या उन्नत मार्ग प्रकल्पाचे दोन टप्प्यांत विभाजन करण्यात आले आहे. पहिला टप्पा वांद्रे-अंधेरीतील जे.पी. रोड असा असेल. त्याची लांबी ७.७६ किलोमीटर असून त्यापैकी जुहू येथील विमानतळाखालून जाणारा सुमारे २.२ किलोमीटर लांबीचा भुयारी मार्गाचाही त्यात समावेश आहे. यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर दुसऱ्या टप्प्यात अंधेरीतील जे.पी. रोडपासून दहिसपर्यंतच्या १८.४ किलोमीटर लांबीच्या उन्नत रस्त्याचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी सुमारे २९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी एकूण ४९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे वांद्रे ते दहिसर हे अंतर अवघ्या अध्र्या तासात कापता येईल अशी अपेक्षा आहे. सध्या गर्दीच्या वेळी त्यास जवळपास एक ते दीड तासही लागतो.तब्बल २६.१६ किलोमीटर लांबीचा हा हा उन्नत मार्ग प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी तो दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे. दोन स्वतंत्र कंपन्यांना काम दिल्यानंतर एकाचवेळी दोन्ही टप्प्यांतील काम सुरू होऊन ते वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अर्थात प्रत्यक्ष कामाच्या निविदा काढताना याबाबतच्या अटींवर अंतिम शिक्कामोर्तब होईल, असेही सांगण्यात आले.हा प्रकल्प मार्गी लावण्याची आर्थिक क्षमता महामंडळात नाही. पण राज्य सरकारने हा प्रकल्प हाती घेऊन त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ‘एमएसआरडीसी’वर सोपवली तर या प्रकल्पाला सरकारचा आधार मिळेल. तसेच विविध आर्थिक समीकरणांची चाचपणी करता येईल व प्रकल्प मार्गी लावता येईल, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा