कल्याण शहरातून अवजड वाहतूक बंद केल्याने कोन येथील टोल कंपनीच्या तिजोरीत महिन्याला काही कोटी रुपयांची तूट दिसू लागली आहे. ही तूट कमी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचा आटापिटा सुरू झाला असून कल्याण शहरातून पत्रीपूल-शिवाजी चौक ते दुर्गाडी किल्ला मार्गे होणारी अवजड वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी २००९ मध्ये अवजड वाहतूक बंदीसाठी काढलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे केली आहे. ही अवजड वाहतूक बंद झाल्यामुळे कल्याणकरांनी सुटकेचा श्वास घेतला होता. असे असताना पुन्हा वाहतूक सुरू व्हावी यासाठी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेला आटापिटा संतापजनक असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांमध्ये उमटू लागल्या आहेत.
कल्याण शहरातून अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे गेल्या काही वर्षांत या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ही वाहतूक बंद करावी यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले होते. तसेच अवजड गाडय़ांची मोडतोड केल्याचा प्रकारही या ठिकाणी घडला होता.
अवजड वाहनांना २४ तास परवानगी दिल्याने हे अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्याने ठाणे पोलीस आयुक्तांनी कल्याण शहरातून दिवसा अवजड वाहतुकीवर बंदी घातली होती. ही वाहतूक रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत होईल असे सूचित करण्यात आले होते. पोलीस आयुक्तांनी आखून दिलेली वेळेची ही मर्यादाही ओलांडली जात असल्याच्या तक्रारी होत्या.
कोन येथे ‘बीकेएसबी’ लिमिटेड या कंपनीमार्फत टोल वसुलीचे काम सुरू आहे. ‘एमएसआरडीसी’च्या अधिपत्याखाली हा टोलनाका येतो. कल्याण शहरातून अवजड वाहतूक दिवसा बंद असल्याने टोल कंपनीच्या महसूलात तूट येऊ लागली आहे. टोल कंपनीला ८९ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. हा महसूल टोल कंपनीला नियमित मिळाला नाही तर शासनाचे दर महिन्याला १ कोटी ५० लाखांचे नुकसान होईल, अशी भीती ‘एमएसआरडीसी’च्या संचालकांनी शासनाकडे व्यक्त केली आहे.
हा पत्रव्यवहार निदर्शनास येताच कल्याणचे आमदार प्रकाश भोईर यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर यांना पत्र लिहून कल्याणमधून अवजड वाहनांना परवानगी दिली तर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तसेच एमएसआरडीसीचे सचिव टोल कंपनीचे लांगुलचालन करत आहेत, असा आरोप केला आहे. नागरिकांच्या जिवापेक्षा टोल महत्त्वाचा नाही. कल्याणबाहेरून जाणारा गोविंदवाडी वळण रस्ता तयार झाल्यानंतर अवजड वाहनांना परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार भोईर यांनी केली आहे.
वाहतूक विभागाचे पत्र
दरम्यान, कल्याण शहर वाहतूक शाखेने गोविंदवाडी वळण रस्ता पूर्ण होईपर्यंत कल्याण शहरातून अवजड वाहतुकीला परवानगी देऊ नये, असे पत्र दोन महिन्यांपूर्वी वरिष्ठांना दिले आहे. कल्याण शहर परिसर पर्यायी रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीने सकाळी ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेला असतो.
गणपती विसर्जन काळात कल्याणमधून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असताना एमएसआरडीसीच्या आग्रहानंतरही या भागातून अवजड वाहतूक सुरू केली जाणार नाही, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे.

Story img Loader