हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात आपल्या मोजक्या पण सदाबहार गाण्यांनी मानाचे स्थान पटकाविणाऱ्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका मुबारक बेगम यांच्या प्रकट मुलाखतीने रविवारी संध्याकाळी अंबरनाथ येथील आनंदघन संगीत पार्क आणि कलादालनाचे उद्घाटन झाले.
शेकडो रसिकांच्या उपस्थितीत जन्मत:च अलौकिक सुरांचे वरदान लाभलेल्या मुबारक बेगम यांनी त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेतील आपला प्रवास उलगडून दाखविला.
मूळच्या राजस्थानमधील मुबारक बेगम पुढे अहमदाबाद तसेच बडोद्याला काही काळ राहिल्या. लहानपणी नूरजहाँ तसेच सुरैय्या यांची गाणी ऐकून त्याही गाऊ लागल्या. आपल्या लेकीच्या गात्या गळ्याचे नशीब अजमाविण्यासाठी वडील त्यांना मुंबईत घेऊन आले. मुंबईत अनेक निर्माते तसेच संगीतकारांकडे खेटे घातल्यानंतर संधी मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले.
सहगायकांपैकी गीता दत्त, आशा भोसले, महम्मद रफी, तलत महेमूद आदींच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गीता दत्त गायिका म्हणून जितकी ग्रेट होती, तितकीच माणूस म्हणूनही श्रेष्ठ होती, असे त्या म्हणाल्या. आशा भोसले यांच्या दिलदारीचाही त्यांनी आदरपूर्वक उल्लेख केला. त्यांनी दिलेल्या चाव्यांचा जुडगा आता तुटला असला तरी त्यांची आठवण म्हणून मी तो जपून ठेवला आहे, हेही त्यांनी सांगितले.  मुलाखती दरम्यान प्रा. मानसी नाडकर, राजकुमार बजाज यांनी त्यांची काही गाणी सादर केली. ‘मुझ को अपने गले लगा लो’, ‘देवता हो तुम हो मेरा सहारा, मैने थामा है दामन तुम्हारा’ आदी गीतांबरोबरच ‘कभी तनहाईयों में यँू’च्या आठवणींनाही उजाळा मिळाला.  चित्रपटसृष्टीतील हेवेदावे, मोनोपॉली, आकस आणि असूयेमुळे पुढे गाणी मिळेनाशी झाली. अनेकदा तर गायलेली गाणी चित्रपटांमधून ऐनवेळी वगळण्यात आली. त्याबद्दल मनात खंत असली तरी रसिकांचे प्रेम कायम असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. चित्रकार मनोज आचार्य यांनी त्यांच्याशी संवाद साधला.  कार्यक्रमादरम्यान सुप्रसिद्ध कवी किरण येले यांच्या ‘बाईच्या कविता’ या काव्य संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मुबारक बेगम यांच्या हस्ते झाले.  ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, अरुण जोशी आदी यावेळी उपस्थित होते. नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते किरण येले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कलादालनाचे उद्घाटन आमदार एकनाथ शिंदे, डॉ. बालाजी किणीकर यांच्या हस्ते झाले.
संतोष शिंदे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन या दालनात भरविण्यात आले आहे. अंबरनाथ येथील आनंदघन संगीत पार्क शहरातील सांस्कृतिक उपक्रमांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Story img Loader