सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यासह शाखा अभियंता जगदीश वाघ यांनी जमविलेली कोटय़वधींची माया पाहून खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी चक्रावून गेले आहेत. कधीकाळी प्राध्यापक असणाऱ्या चिखलीकरच्या कर्तृत्वामुळे या विभागातील गैरव्यवहाराकडे सर्वाचे लक्ष गेले आहे. पंधरा वर्षांत ज्या ज्या ठिकाणी बदली झाली, त्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात स्थावर जंगम मालमत्ता चिखलीकरने खरेदी केल्याचे तपासात पुढे आले आहे. चिखलीकर व वाघ यांच्या मालमत्तांची कागदपत्रे इतकी प्रचंड आहेत की, त्या सर्वाची शहानिशा करता करता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दमछाक होत आहे. या दोन अभियंत्यांकडे सापडलेली संपत्ती लक्षात घेतल्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहारांचा ‘चिखल’ सहजपणे लक्षात येईल.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना संबंधितांना पकडल्यानंतर या अभियंत्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि ते मंगळवारी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. परिणामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्यांना अद्याप अटक करता आली नाही. संपूर्ण राज्यातील रस्त्यांची देखभाल, बांधणी व दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या सार्वजनिक पाटबंधारे विभागातील कारभार कशा पद्धतीने चालतो, त्याची प्रचीती या दोन अभियंत्यांकडील डोळे दिपवून टाकणाऱ्या मालमत्तेवरून सहजपणे येऊ शकते. ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलेला सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता व त्र्यंबकेश्वर उपविभागीय कार्यालयातील शाखा अभियंता या दोघांकडे कोटय़वधीच्या रोख रकमेसह स्थावर मालमत्तांची इतकी मोठी जंत्री आढळली की, दुसऱ्या दिवशीही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याची संपूर्ण यादी तयार करू शकलेला नाही. चिखलीकर यांच्या घरझडतीत दोन कोटी ९६ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. ही रक्कम ते इनोव्हा गाडीतून दुसरीकडे पाठविण्याच्या प्रयत्नात होते. यावरून या अभियंत्यांच्या प्रचंड गुंतवणुकीचा आवाका लक्षात येईल.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात चिखलीकर हे मुख्य संशयित आहेत. त्यांच्या वतीने शाखा अभियंता वाघ याने लाचेची रक्कम स्वीकारली होती. नांदेड जिल्ह्यातील चिखली येथील मूळ रहिवासी असलेला चिखलीकर सांगली जिल्ह्यात एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होता. १९९४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो साहाय्यक अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाला. या विभागातील नोकरीने जणू त्याला सोन्याची खाण गवसली. तपास यंत्रणेने आतापर्यंत केलेल्या छाननीत चिखलीकर ज्या ज्या भागात बदलीवर गेला, त्या सर्व भागात त्याने मालमत्ता खरेदी केली आहे. आतापर्यंतच्याछाननीत चिखलीकरची बीड, परभणी, लातूर, नाशिक आदी भागात लाखो रुपयांची मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. मालमत्तांच्या कागदपत्रांची संख्या इतकी मोठी आहे की, त्यांची छाननी त्वरेने करणेही तपास यंत्रणेला कठीण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील १८ वर्षांच्या सेवेत चिखलीकरने जमविलेली माया पाहून कुणाचेही डोळे विस्फारतील.१९९७ मध्ये बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झालेल्या जगदीश वाघची प्रगतीही अशीच धक्कादायक. शाखा अभियंता म्हणून बढती मिळाल्यावर काही दिवसांपूर्वीच त्याने कॉलेज रोड परिसरात प्रत्येकी दोन हजार चौरस फुटांची दोन घरे खरेदी केली. उच्चभ्रू वसाहतीच्या या भागात सहा ते सात हजार रुपये एका चौरस फुटाचा दर आहे. याचा विचार करता वाघच्या एका घराची किंमत तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक आहे. एकाच वेळी तब्बल दोन कोटींची गुंतवणूक करण्याची वाघची क्षमता त्याचे ‘अमोघ कर्तृत्व’ सिद्ध करण्यासाठी पुरेशी ठरावी.
‘सार्वजनिक बांधकाम’मध्ये गैरव्यवहारांचा ‘चिखल’
सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यासह शाखा अभियंता जगदीश वाघ यांनी जमविलेली कोटय़वधींची माया पाहून खुद्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी चक्रावून गेले आहेत.
आणखी वाचा
First published on: 02-05-2013 at 03:19 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mud of malpractice in public work department