डी. एड.धारकांना लागू केलेल्या टी. ई. टी. परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात चांगलाच गोंधळ उडत आहे. शेकडो उमेदवारांच्या अर्ज स्वीकृतीसाठी केवळ दोनच खिडक्या उपलब्ध असल्याने दोन दिवसांपासून रेटारेटी सुरू आहे. मात्र, शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष चालविले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक व वरिष्ठ प्राथमिक व सर्व माध्यमांतील शिक्षक पदांसाठी पात्रता प्रमाणपत्र, अर्थात टी. ई. टी. परीक्षा सरकारने लागू केली आहे. ही परीक्षा भावी शिक्षकांसाठी बंधनकारक आहे. येत्या १५ डिसेंबरला राज्यभरात एकाच वेळी टी. ई. टी. परीक्षा होणार आहे. या साठी २० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आवेदनपत्र मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरल्यानंतर त्याच्या दोन प्रती व इतर कागदपत्र प्रत्येक जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात समक्ष उपस्थित राहून आणून देणे बंधनकारक आहे.
परभणीत कन्या प्रशालेत असलेल्या शिक्षणाधिकारी कार्यालयात आवेदनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. परंतु जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने डी. एड.धारक बेरोजगार असताना अर्ज स्वीकृतीसाठी केवळ दोनच खिडक्या सुरू आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान अर्ज स्वीकारण्यात येतात. मात्र, कागदपत्रांची तपासणी करून अर्ज स्वीकारले जात असल्याने यास बराच वेळ लागत आहे आणि अर्ज दाखल करणारांची संख्याही हजारोच्या घरात असल्याने दररोज कन्या प्रशालेत जत्रेचे स्वरुप येत आहे.
गुरुवारी सकाळी सातपासूनच मुले व मुली या परिसरात दाखल झाले. सकाळपासून रांगेत असलेल्यांचे अर्ज थेट अकरापासून घेण्यात आले. भर उन्हात अनेकांनी दिवसभर रांगेत उभे राहून अर्ज दाखल केले. या दरम्यान अनेकदा रेटारेटी झाली. काहींचे पर्यवसन वादात झाले. दुपारी पोलिसांनाही पाचारण केले होते. पोलिसांनी रांग लावण्यासाठी उमेदवारांवर लाठीचा वापर केला. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता.

Story img Loader