काँग्रेस राजवटीत दुर्लक्षित झालेल्या आणि भाजप नेतृत्वातील अटलबिहारी बाजपेयी सरकारातही विस्मृतीत गेलेल्या आणि देशाच्या जडणघडणीत अविस्मरणीय कामगिरी केलेल्या जयप्रकाश नारायण, श्यामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय, सरदार वल्लभभाई पटेल या महान राष्ट्रपुरुषांची नावे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या विविध योजनांना दिल्यामुळे संघ परिवाराप्रमाणे देशप्रेमी असंख्य नागरिकांना कमालीचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.  
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जनसंघाचे संस्थापक आणि काश्मीर मुद्यावरून पं. नेहरू सरकारातून बाहेर पडलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव ग्रामीण नागरी एकात्मिक प्रकल्प योजनेला दिले आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी जनसंघाचेच अध्यक्ष असतांनाच त्या पक्षाचे सरचिटणीस व पुढे अध्यक्ष झालेल्या एकात्म मानवतावादाचा पुरस्कार करणाऱ्या पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे नाव ग्रामज्योती अर्थात, ग्रामीण विद्युतीकरण योजनेला दिले आहे. २६ जून १९७५ ला देशात लावण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळातील इंदिरा गांधीचे सरकार १९७७ मध्ये  संपूर्ण क्रांतीच्या नाऱ्याने उलथून पाडण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या जेपी अर्थात, जयप्रकाश नारायण यांचे नाव मध्यप्रदेशात स्थापन होणाऱ्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ प्रकल्पाला दिले आहे, तर संस्थानिकांचे विलीनीकरण करून त्यांना भारतात समाविष्ट करणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव स्टॅच्यु ऑफ युनिटी प्रकल्पाला दिले आहे. ज्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व नरेंद्र मोदी करीत आहेत, त्या वाराणसीत बनारस िहदू विश्वविद्यालयाची स्थापना करणाऱ्या पंडीत मदनमोहन मालवीय यांचे नाव लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या शिक्षण प्रकल्पाला दिले आहे.
आतापर्यंत अशा कोटय़वधी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना गांधी व नेहरू घराण्यातील लोकांची नावे देण्यात आली होती. मात्र, पक्षीय दृष्टीकोन बाजूला ठेवून राष्ट्रपुरुषांची नावे देण्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले होते. विशेष हे की, भाजप नेतृत्वातील अटलबिहारी वाजपेयी सरकारलाही अशा राष्ट्रपुरुषांचे विस्मरण झाले होते. मात्र, जनतेला आज जे दुसरे स्वातंत्र्य ज्या जयप्रकाश नारायण यांच्यामुळे मिळाले, आजच्या सत्तारूढ भाजपची मुळे ज्या श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांनी रोवलेल्या बीजांकुरामुळे पक्की झाली आहेत. त्यांचे ऋण अंशत फेडण्याचे काम मोदी सरकारने केल्याचा आनंद संघ परिवाराप्रमाणे सामान्य माणसालाही होत असल्याची प्रतिक्रिया आहे.
यांचेही स्मरण व्हावे
विस्मृतीत गेलेल्या राष्ट्रपुरुषांचे स्मरण योजनांच्या दिलेल्या नावाने करून एक चांगली सुरुवात मोदी सरकारने केली. पुढच्या चार वर्षांत सादर होणाऱ्या अंदाजपत्रकात रा.स्व.संघाचे संस्थापक डॉ. बळीराम हेडगेवार, तसेच संघाचे दुसरे सरसंचालक गोळवलकर गुरुजी, जेपींचे निकटस्थ आचार्य कृपलानी, जनसंघाचे अध्यक्ष राहिलेले बच्छराजची व्यास यांचीही नावे यांच्या योजनांना द्यावीत, अशी संघप्रेमींची इच्छा आहे. अरुण जेटली यांच्या अर्थसंकल्पात बऱ्याच योजना निनावी आहेत. ही नावे त्यांना देता येतील.

Story img Loader