कलेच्या अविष्काराला मार्गदर्शनाचे कोंदण मिळाले की एखाद्या हिऱ्याप्रमाणे तो लख्ख उजळून निघतो. तसाच काहीसा प्रकार सिंधुदुर्गातील कलेची आस असणाऱ्या काही धडपडय़ा मुलांनी अनुभवला. चित्रपट पाहणे ही जिथे चैन ठरते अशा गावांमधील मुले एकत्र येऊन लघुपट बनवतात काय आणि त्याची गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड होते काय, हा सगळा प्रकारच विलक्षण होता. पण, ग्रामीण भागातील गुणवंतांनाही जर योग्य मार्गदर्शन आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या गेल्या तर सिंधुदुर्गाच्या लाल मातीतही चित्रपटनिर्मितीसारखी अवघड कला फुलू शकते, हे ‘मुक्ती’ या दर्जेदार चित्रपटाने सिध्द केले आहे. 
‘सिंधुभूमी कला अकादमी’ या आमदार प्रमोद जठार यांच्या संस्थेने चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन अशा साऱ्या तंत्रांचे प्रशिक्षण देणारे शिबिर आयोजित केले जात होते. या शिबिरात सहभागी झालेल्या मुलांनी बनवलेल्या ‘मुक्ती’ या पहिल्यावहिल्या लघुपटाची गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. एकूण १४७ आंतरराष्ट्रीय लघुपटांमधून १९ लघुपटांची या महोत्सवासाठी निवड झाली त्यात ‘मुक्ती’ या लघुपटाचा समावेश आहे. हौशी चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणाऱ्या ‘स्पंदन परिवार सिनेमा मुव्हमेंट’ या संस्थेने शिबिरातील मुलांना चित्रपटाशी संबंधित सर्वागीण गोष्टींचे प्रशिक्षण दिले आणि मग याचे प्रात्यक्षिक सुरू झाले.
आपल्या पहिल्यावहिल्या लघुपटासाठी कथाही कोकणातल्या लाल मातीतलीच हवी म्हणून पहिल्यांदा कथेची मांडणी झाली. सिंधू नावाची अंध मुलगी आणि तिची भावंडे यांच्याभोवती गुंफण्यात आलेली कथा गावातील खोतांच्या वाडय़ातील रहस्यापर्यंत जाऊन पोहोचते. भजनी मंडळ चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या सिंधूवर गावातील खोत रावसाहेब यांच्या छोटय़ा भावाचा जनार्दनचा जीव जडतो. ही गोष्ट ध्यानात येताच रावसाहेब या चौघा भावंडांना गावाबाहेर हाकलतात. मात्र, त्याचवेळी रावसाहेबांचे वडिल गोविंद बाप्पा खोत यांचे निधन होते. त्यांच्या मृत्यूपत्रात वाडय़ातील एका रहस्याचा उल्लेख असतो. हे रहस्य जो उकलेल तो वाडय़ाचा खरा वारसदार होईल, असे त्यांनी मृत्यूपत्रात लिहिलेले असते. वाडय़ाचे हे गूढ सिंधूसारखी सच्च्या मनाची मुलगीच उकलू शकले, असा विश्वास जनार्दनला वाटत असतो. त्याचा हा विश्वास खरा ठरतो का आणि वाडय़ाची शापातून ‘मुक्ती’ होते का, याची ही कथा सिंधुदर्गातीलच कलाकारांनी एकत्र येऊन जिवंत केली आहे.
कथा निश्चित झाल्यानंतर शिबिरात सहभागी झालेल्या प्रत्येकाला एकेक जबाबदारी देण्यात आली. वेंगुल्र्यातील अ‍ॅंथोनी फर्नाडिस आणि मालवणच्या श्रीधर मेस्त्रींनी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली. छायाचित्रणासाठी सावंतवाडीचे अंड्रय़ू फर्नाडिस आणि देवगडचे दर्शन दुखंडे पुढे आले. तर देवगडची वृषाली खाडिलकर, प्राची लेले, अभिषेक दुखंडे, नयना साठे, कणकवलीचे शशिकांत कांबळी, स्नेहा सुतार, अमृता गावकर तर वैभववाडीचे अजय लेले आणि पुण्याचे दीपक माने असे कलाकार एकत्र आले आणि ‘मुक्ती’ हा लघुपट आकाराला आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा