आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला असून विद्यमान काँग्रेस खासदार मुकुल वासनिक २४ ऑगस्टला तर त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे ३१ ऑगस्टला रामटेक भेटीवर येत आहेत. रामटेकची लोकसभेची जागा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. गेल्या निवडणुकीत मुकुल वासनिक यांनी हा बालेकिल्ला काँग्रेसकडे खेचून आणला. रामटेक विधानसभा मतदारसंघाची जागा मात्र शिवसेनेचे आशिष जयस्वाल यांच्याकडे आहे. लोकसभेची जागा खेचून आणण्यासाठी शिवसेनेने जबरदस्त तयारी सुरू केली असली तरी महायुतीत सहभागी असलेले रिपाइं नेते रामदास आठवले यांचा रामटेकवर डोळा असल्याने शिवसेनेची पंचाईत झाली आहे.
ही जागा आरक्षित असून गेल्यावेळी शिवसेनेचे कृपाल तुमाने पराभूत झाले होते. त्यांनाच यावेळी पुन्हा लढविण्याचे संकेत मिळाले आहेत. परंतु, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर शिवसेनेचा निर्णय होण्याची शक्यता असल्याने ठाकरेंच्या भेटीत काय निर्णय होणार याचे आराखडे बांधले जात आहेत.
रामटेकमधून शिवसेनेचा भगवा सलग तीन निवडणुकांत फडकला होता. त्याला मुकुल वासनिकांच्या उमेदवारीने शह बसला. मात्र, मतदारसंघाशी संपर्क ठेवण्यात मुकुल वासनिक अपयशी ठरल्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. याची चाचपणी करण्यासाठी उद्धव ठाकरे येत्या ३१ ऑगस्टला रामटेक भेटीवर येणार असून कार्यकर्त्यांची मते जाणून घेणार असल्याचे समजते. यावेळी ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलणार आहेत.
मुकुल वासनिकांनाही मतदारांमधील नाराजीची कल्पना असल्याने त्यांनी जनता दरबारांचे सत्र सुरू केले आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून ते २४ ऑगस्टला मतदारांशी थेट संपर्क साधणार आहेत. तर उद्धव ठाकरे यांचे ३१ ऑगस्टला दुपारी ४ वाजता रत्नागिरीहून नागपुरात आगमन झाल्यानंतर ते थेट रामटेकला रवाना होणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
रामटेकची जागा आठवले यांनीच मागितल्याने शिवसेनेचे नेतृत्त्व द्विधा मनस्थितीत आहे. राज्यातील उत्तर मध्य मुंबई, कल्याण, पालघर, पुणे, लातुर, सोलापूर आणि विदर्भातील रामटेक व चिमूर या मतदारसंघांवर आठवले गटाने दावा केला आहे.

उद्धव ठाकरेंची रामटेक भेट महत्त्वाची
विधानसभा निवडणुकीसाठी पूर्व विदर्भातून आठवले यांनी १४ जागांचे प्रस्ताव दिले असून त्यात वर्धा, देवळी, पुलगाव, भंडारा, राजुरा, आरमोरी, चंद्रपूर, मोरगाव अर्जुनी, उत्तर नागपूर, दक्षिण नागपूर, काटोल, सावनेर, देवळी, आमगाव, गोंदियाचा समावेश आहे. यापैकी किमान ६ जागा मिळाव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. पश्चिम विदर्भात चार जागांची मागणी करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरेंची रामटेक भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Story img Loader