राहुरी व श्रीरामपूर तालुक्यात चार दिवसांच्या उघडिपीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले. आज दिवसभर झिमझिम पाऊस पडत होता. दरम्यान मुळा व प्रवरा या दोन्ही नद्या आता १५ ऑगस्टपूर्वी दुथडी भरून वाहण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर या नद्या वाहत्या होणार आहेत.
चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यापूर्वी आठ दिवस झिमझिम पाऊस झाला. या पावसाने पिकांमध्ये तण वाढले, शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी व ऊस या पिकांच्या खुरपण्या सुरू केल्या होत्या. तणपोशा पावसाने एकाच वेळी शेतकऱ्यांना खुरपणीसाठी मजुरांची गरज पडली. त्यामुळे मजूरटंचाई तयार होऊन खुरपणीचे दर वाढले. सोयाबीन खुरपणीचा दर एकरी दोन हजारांवरून चार हजारांवर गेला. २५ टक्के क्षेत्रातील खुरपणी झाली. पण आजपासून पुन्हा पाऊस पडू लागल्याने हे काम बंद पडले.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. धरणात १७ हजार ६०७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. धरण १५ ऑगस्टपूर्वी भरेल, पण पाटबंधारे खात्याच्या नियमानुसार मुळा धरणात २१ हजार ५०० दशलक्ष घनफूटच पाणी अडवता येणार आहे. पावसाने साथ दिली तर आठवडाभरातच हा पाणीसाठा उद्दिष्टाइतका होईल. त्यानंतर नदीपात्रात जायकवाडीला पाणी सोडावे लागेल. येत्या आठवडाभरात मुळा नदी वाहती होणार आहे. मुळेला पाणी येण्याची शक्यता असल्याने वाळूतस्करांनी वाळूउपसा सुरू केला आहे. भरपावसात हे काम सुरू आहे.

Story img Loader