उसाचे अंतिम पेमेंट, परतीच्या ठेवी तसेच ठेवीवरील व्याजाच्या रकमेसह एकूण ४० कोटी रुपये मुळा सहकारी साखर कारखाना दिवाळीपूर्वी शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष यशवंतराव गडाख यांनी रविवारी कारखान्याच्या ३६व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात दिली.
कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन हभप उद्धवमहाराज मंडलिक यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ज्येष्ठ नेते गडाख बोलत होते. आमदार शंकरराव गडाख उपस्थित होते. गडाख म्हणाले, की साखरेच्या भाव अस्थिर आहेत, त्यासाठी शेतकरी हितातून ४२ कोटी रुपयांचा चढउतार निधी उभारण्यात आला आहे. १२ कोटी रुपयांचा संचित नफा व वीज प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याच्या स्वनिधीसाठी १० कोटी रुपये बँकेत ठेव म्हणून ठेवण्यात आले आहेत. खोडव्यासाठी ६ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे व ४० कोटी रुपयांचे दिवाळीपूर्वी पेमेंट केले जाईल.
हभप मंडलिक यांनी राज्यात अनेक साखर कारखाने बंद पडत असताना ज्येष्ठ नेते गडाख यांच्या दूरदृष्टीमुळे व समाजासाठी संस्था चालवण्याच्या भावनेमुळे कारखाना प्रगती करत असल्याचा गौरव केला. संचालक अण्णासाहेब सोनवणे व कडू पाटील कर्डिले यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली. उद्धवमहाराज यांचा पंढरपूर येथे नुकताच महंत म्हणून सन्मान झाल्याबद्दल गडाख यांनी त्यांचा सत्कार केला. प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झालेले कर्मचारी बबनराव बोरुडे व रावसाहेब जाधव यांचाही सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे उपाध्यक्ष जबाजी फाटके, रामभाऊ जगताप, शंकरराव लोखंडे, अ‍ॅड. काकासाहेब गायके, सरपंच नंदकुमार पाटील अ‍ॅड. के. एच. वाखुरे, माजी सरपंच शिवाजीराव टेकावडे, फारूक दारूवाले, सभापती कारभारी जावळे, विश्वासराव गडाख, नानासाहेब तुंवर आदी उपस्थित होते.

Story img Loader