अधिकार नसताना एकच वॉर्ड, मंडलची निवडणूक जाहीर
‘पार्टी विथ डिफरन्स’ असे बिरूद मोठय़ा दिमाखाने मिरविणाऱ्या भाजपमधील पक्षांतर्गत कलह अलीकडेच अनेकदा चव्हाटय़ावर आले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती आता मुंबई भाजपमध्येही होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अलीकडेच आमदारकीची झूल खांद्यावर चढविलेल्या एका पदाधिकाऱ्याने मुंबई भाजपचे अध्यक्ष अथवा अन्य संबंधित यांना न विचारताच मुंबईतील आपल्या वॉर्डचा आणि मंडलाचा निवडणूक कार्यक्रमच जाहीर केल्याने मुंबई भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
मुंबईचा अध्यक्ष आणि अन्य संबंधित एकत्रित बसून निवडणुकीची प्रक्रिया ठरवितात. त्यासाठी आधी सदस्य नोंदणी आवश्यक असली तरी सदस्य नोंदणीची पुस्तकेच अद्याप तयार झालेली नाहीत. जो ठरावीक रक्कम भरून सदस्य नोंदणी करतो, त्यालाच पदाधिकारी होता येते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र ही प्रक्रियाच सुरू झालेली नाही. असे असताना आमदार आशीष शेलार यांनी मुंबई अध्यक्षांच्या अधिकारावर अतिक्रमण करून आपल्या जिल्ह्य़ाची बैठक घेऊन १२ जानेवारी रोजी वॉर्डची तर १४ जानेवारी रोजी मंडलची निवडणूक होईल, असे जाहीर केले आहे, त्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. आमदारकीची झूल खांद्यावर आल्यानंतर आता शेलार यांना मुंबईचा अध्यक्ष होण्याचे वेध लागले आहेत, अशी चर्चा आहे. असे असले तरी त्यांना अध्यक्षांचे अधिकार कोणी दिले, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मुंबई भाजपच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्य़ाची निवडणूक जाहीर करण्याच्या प्रकाराचे तीव्र पडसाद उमटले. मुंबईतील पाच जिल्हाध्यक्ष या बैठकीला हजर होते, मात्र ज्या जिल्ह्य़ातील निवडणूक जाहीर करण्यात आली आहे त्या जिल्ह्य़ाचा अध्यक्ष निषेध म्हणून या बैठकीलाच हजर नव्हता असे कळते. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका देशभरात लवकरच होणार आहेत. मुंबईच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व असते. कारण मुंबईचा अध्यक्ष हा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य असतो आणि त्यामुळेच तो अन्य संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो. असे असताना मुंबईतील एकाच जिल्ह्य़ाची निवडणूक जाहीर करण्यात आल्याने मुंबईतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. आमदार आपल्या अधिकारात एका जिल्ह्य़ाचा निवडणूक कार्यक्रम कसा जाहीर करू शकतो, असा सवाल आता विचारला जात असून त्याला पक्षातील कोणाचे पाठबळ आहे, याची कुजबुजही सुरू झाली आहे. या प्रकारामुळे सदर आमदाराचे पक्षांतर्गत विरोधक सरसावले आहेत.  याबाबत आशीष शेलार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपाचा स्पष्ट इन्कार केला. आपल्याला अधिकारच नाहीत, मग आपण निवडणूक जाहीर कशी करणार, असा सवालही त्यांनी केला. जिल्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केवळ निवडणुकीबाबत चर्चा झाली असेही ते म्हणाले. जिल्ह्य़ाचे सरचिटणीस सुहास आडिवरेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुंबईचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आपला जिल्हा मागे असू नये त्यामुळे पूर्वतयारीची चर्चा करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाहेरगावी असल्याने ते बैठकीला हजर नव्हते, असेही आडिवरेकर म्हणाले. सदस्य नोंदणीच्या पुस्तिका तयार नसल्याबाबत कोणत्याही पदाधिकाऱ्याने काहीही भाष्य करण्यास नकार दिला.