मुंबईमध्ये डेंग्यूचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होत असताना पालिका प्रशासन मात्र उदासीन असल्याचा प्रत्यय ग्रॅन्टरोड येथील नागरिकांना सध्या येत आहे. ग्रॅन्टरोड येथे राहणाऱ्या महापालिकेच्या शीव रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचे डेंग्यूने निधन झाल्याचे समजताच पालिकेचे कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी चौकशी, रक्ताचे नमुनेही घेतले आणि एकदा धूम्रफवारणीही केली. पण त्यानंतर पालिकेचा एकही कर्मचारी या भागात फिरकलेला नाही. आता आसपासच्या इमारतींतही डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्याने रहिवाशांच्या छातीत धडकी भरली आहे. गंभीर बाब म्हणजे येथील मोडकळीस आलेल्या पालिका शाळेच्या पाडकामामुळेच डासांची उत्पत्ती होत असून त्यावर अद्यापही उपाययोजना करण्यात आलेली नाही. शीव रुग्णालयात स्टोअर किपर म्हणून कार्यरत असलेल्या अंजली नंदकुमार सावंत यांचे अलीकडेच डेंग्यूने निधन झाले. एखाद्या ठिकाणी हिवताप, डेंग्यू अथवा अन्य साथीच्या आजाराने रुग्णाचे निधन झाले तर पालिका कर्मचारी तेथे धाव घेऊन आवश्यक ती उपाययोजना करतात. अंजली सावंत यांचे डेंग्यूमुळे निधन झाल्याचे समजताच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रॅन्टरोडमधील टोपीवाला लेन येथील आगबोटवाला बिल्डिंगमध्ये धाव घेतली. सावंत कुटुंबीयांकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या, तसेच इमारतीमधील रहिवाशांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. तत्परतेने या परिसरात धूम्रफवारणीही करण्यात आली. डासांच्या प्रादुर्भावामुळे वैतागलेल्या रहिवाशांना पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हायसे वाटले. परंतु त्यांचा हा अनुभव क्षणिकच ठरला. टोपीवाला लेनमध्ये एकदा धूम्रफवारणी करून गेलेला कर्मचारी आजतागायत तेथे फिरकलेलाच नाही. परिणामी डासांचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. आता आगबोटवाला बिल्डिंगच्या आसपासच्या इमारतीमधील रहिवाशांनाही डेंग्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढू लागल्यामुळे टोपीवाला लेन आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशी धास्तावले आहेत. अंजली सावंत यांचे निधन झाल्यानंतर आगबोटवाला इमारतीमधील रहिवाशांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. आता डेंग्यूग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने पालिकेने घेतलेल्या रक्ताच्या या नमुन्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.
दिव्याखाली अंधार!
एकेकाळी ग्रॅन्टरोडमधील टोपीवाला लेन महापालिका शाळेमुळे हा परिसर गजबजून जात होता. परंतु विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरली आणि शाळा बंद पडली. मोडकळीस आलेली शाळेची इमारत धोकादायक बनल्यामुळे ती पाडून टाकण्याचा निर्णय पालिकेने घेतला. गेल्या काही महिन्यांपासून या शाळेचे पाडकाम सुरू असून मोठय़ा प्रमाणावर राबीट पडले आहे. टोपीवाला लेनमध्ये दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींमधील घरगल्ल्या स्वच्छ राहाव्यात याची रहिवाशी काळजी घेत आहेत. पण शाळेचे पाडकाम सुरू झाल्यापासून राबीट उचलण्यात आलेले नाही. यामुळे येथे प्रचंड अस्वच्छता झाली आहे. पालिका आयुक्त सीताराम कुंटे सध्या हातात झाडू घेऊन स्वच्छ रस्त्यांवर ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात मग्न आहेत. पण टोपीवाला लेनमधील आपल्याच शाळेच्या पाडकामामुळे झालेली अस्वच्छता डेंग्यूच्या प्रार्दुभावास कारणीभूत ठरल्याचे त्यांना दिसत नाही, अशी टीका येथील रहिवासी करू लागले आहेत.

Story img Loader