हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेने जगभरातील आबालवृद्धांना अक्षरश: वेड लावले. क्षणात गायब होण्यापासून रिकाम्या डब्यातून हवे ते पदार्थ काढून देण्यापर्यंत तसेच करवतीने माणसाला कापून दोन तुकडे केल्यानंतर पुन्हा जोडण्यापर्यंत जादूचे प्रयोग तुमच्या जीवनात आनंद तर निर्माण करतातच; पण जादूच्या साहाय्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासही निर्माण करता येतो. ही जादूची दुनिया नेमकी असते कशी हे माटुंगा येथील यशवंत नाटय़गृहात येत्या २४ ते २६ मे या कालावधीत अनुभवायला मिळणार आहे. भारतच नव्हे तर जगभरातून सुमारे सहाशे जादूगारांची तीन दिवसांची एक परिषद मुंबईत प्रथमच होत आहे.
विख्यात जादूगार भूपेश दवे यांनी अलीकडेच मुंबईत राज्यातील पहिली ‘मॅजिक अकादमी’ स्थापन केली. त्यांच्याच प्रयत्नांतून देश-विदेशातील जादूगारांची ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. बंगाल, आसाम, केरळसह देशभरातून साडेपाचशे जादूगार आपली कला या परिषदेत सादर करणार आहेत. याशिवाय परदेशातूनही अनेक दिग्गज जादूगार या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आल्याचे भूपेश दवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दवे यांच्या चाहत्यांची नामावली दिलीपकुमार ते माधुरी दीक्षित अशी भक्कम आहे. देश-विदेशांत गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ते जादूचे प्रयोग करत आहेत. राष्ट्रपती पुरस्कारापासून अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या भुपेश दवे यांनी जादू या कलेले वाहून घेतले आहे. यासाठीच महराष्ट्रातील पहिली मॅजिक अकादमी त्यांनी दादर येथे स्थापन केली आहे. याच अकादमीच्या माध्यमातून देशभरातील जादूगारांना राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून एका व्यासपीठावर आणण्याची त्यांची तळमळ आहे. या जादू महोत्सवात मुंबईचे जादूगार दीपक पांडे, बंगलोरचे ए. के. दत्त, दिल्लीचे राजकुमार, पश्चिम बंगालचे रजत, मलेशियाचे जोरीन व गेल्विन तसेच इजिप्त, कुवेत आदी देशातील नामवंत जादूगार या परिषदेला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत भारतातील सिनियर व ज्युनियर  राष्ट्रीय जादुगार स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. जादूला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याबरोबरच विविध सामाजिक कार्यामध्ये जादूचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो हे या परिषदेच्या निमित्ताने पाहावयास मिळेल, असे दवे यांचे म्हणणे आहे.
तीन दिवसांच्या या जादूच्या परिषदेत २४ व २५ मे रोजी मुंबईकरांना देशभरातील तसेच देशोदेशीच्या जादूगारांच्या करामती पाहायला मिळतील. या दोन्ही दिवशी रात्री ९ ते ११ या कालावधीत रसिकांना या जादुई करामती अनुभवता येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९८२००३८९७६ अथवा ९८२०४३३२२५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा