जुन्या कंत्राटदारांची मुदत संपल्यानंतर पालिकेने काढलेल्या नव्या निविदांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरविल्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम थंडावली आहे. परिणामी यंदा पावसाळ्यात मुंबई खड्डय़ातच राहण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एक हजाराहून अधिक खड्डे न बुजविणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध पालिकेने कोणतीही कारवाई केलेली नव्हती.
पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांची मुदत ऑक्टोबर २०१२ मध्ये संपुष्टात आली. त्यानंतर नव्या कंत्राटदारांची नियुक्ती करण्याकडे प्रशासनाने फारसे लक्ष दिले नाही. सत्ताधारी शिवसेना-भाजपनेही त्यात लक्ष घातले नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यांवरील खड्डय़ांचा प्रश्न गंभीर बनला आहे. आता धावतपळत प्रशासनाने निविदा जारी केल्या. परंतु कंत्राटदारांनी त्याला फारसा प्रतिसाद न दिल्याने प्रशासनची कोंडी झाली आहे. लवकरच कंत्राटदारांची नियुक्ती होईल आणि खड्डे बुजविण्याचे काम सुरू होईल, अशी आशा करणे एवढेच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या हाती राहिले आहे.
अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलवर काढलेले खड्डय़ाचे छायाचित्र पालिकेकडे पाठवून तो भरण्याची अभिनव योजना पालिकेने २०११ मध्ये अंमलात आणली. वेबसाइटवर खड्डय़ाचे छायाचित्र उपलब्ध होताच पालिकेच्या अभियंत्यांकडून त्याची पाहणी केली जाते. त्यानंतर तो बुजविण्यासाठी कंत्राटदाराला सूचना केली जाते. तसेच हमी कालावधीत रस्त्यावर पडलेला खड्डा बुजविण्याची जबाबदारी रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदारावर सोपविण्यात येते. १ नोव्हेंबर २०११ ते १ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत मुंबईकरांनी तब्बल २६,०५८ खड्डय़ांची छायाचित्रे काढून ती पालिकेकडे पाठविली. पालिकेच्या रस्ते अभियंत्यांनी त्यापैकी २४,९६० खड्डय़ांची पाहणी करून ते बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपविली. मात्र त्यापैकी १०९८ खड्डय़ांची अभियंत्यांनीच पाहणी केलेली नाही. तर कंत्राटदारांनीही २३,३२२ खड्डे बुजवून उर्वरित १६२८ खड्डे वाऱ्यावर सोडून दिले. काम अपूर्ण अवस्थेत सोडून कंत्राटदारांनी आपली बिले मात्र पालिकेकडे सादर केली. आणि पालिकेनेही तातडीने त्यांना सुमारे ६० ते ७० टक्के रक्कम अदा केली आहे.
ऑक्टोबर २०१२ मध्ये मुदत संपुष्टात आल्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी नव्या कंत्राटदारांची नियुक्ती प्रशासनाने तातडीने केली नाही. ई-निविदा काढल्या तर कंत्राटदारांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मागील पावसाळ्यातील खड्डे वर्षभर आणखी मोठे आणि खोल होत गेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पावसाळ्यात रस्त्यांवरून फिरताना ‘लाइफ जॅकेट’ घालून घराबाहेर पडावे का याचा विचार करण्यास हरकत नाही!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा