मध्य रेल्वेने १ जुलैपासून मुंबई-लातूर सुपरफास्ट गाडी नांदेडपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यास लातूरकरांमधून झालेला तीव्र विरोध लक्षात घेऊन रेल्वे विभागाने ही रेल्वे लातूपर्यंतच ठेवण्याचे निश्चित केले आहे. दि. १ जुलै रोजी मुंबईहून लातूरला आलेली रेल्वे पुढे गेलीच नाही.
मागच्या आठवडय़ात नांदेडचे खासदार भास्करराव खतगावकर यांच्या पुढाकाराने मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत धावणार असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले. त्यापूर्वी लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन लातूरकरांच्या रेल्वे विभागाकडून असलेल्या अपेक्षांचे निवेदन त्यांना दिले. लातूर-पुणे रेल्वे नियमित करावी, लातूरहून तिरुपतीला रेल्वे सोडावी, लातूर रेल्वेस्थानकावरील सुविधा वाढवावी, हरंगुळ येथे मुख्य रेल्वेस्थानक करण्यास रेल्वे विभागाने आíथक तरतूद करावी आदी मागण्यांचा यात समावेश होता. त्यानंतर लातूरची रेल्वे नांदेडपर्यंत जाणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे लातूरकर चांगलेच संतापले. आयुक्तालयानंतर रेल्वेचा वाद पुढे करून नांदेडकर विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूरला कोणी वाली नाही, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात होते, मात्र १ जुलै रोजी लातूरची रेल्वे नांदेडला धावलीच नाही.
लातूरकरांना खिजवण्यासाठी मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा घाट नांदेडकर घालत असल्याची भावना लातूरकरांमध्ये पसरून लातूरकर चांगलेच संतप्त झाले होते. या पाश्र्वभूमीवर लातूरकरांच्या भावना लक्षात घेऊन रेल्वेने मुंबई-लातूर रेल्वे लातूपर्यंतच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लातूरकर तूर्तास सुखावले आहेत, मात्र रेल्वे विभागाकडून लातूरकरांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशीही रास्त अपेक्षा आहे.
गणित फसले
मुंबईहून नांदेडला लातूरमाग्रे जाण्यासाठी रेल्वेने अधिकचे सहा तास लागतात. वर्षभरापूर्वी रेल्वेने लातूर-नांदेड प्रवासाचा अनुभव घेतला होता, त्या वेळी नांदेडहून मुंबईला जाण्यासाठी सहा महिन्यांत एकाही प्रवाशाने तिकीट काढले नव्हते. लातूर-नांदेड रेल्वेप्रवासाचे अंतर सहा तासांचे असल्यामुळे व त्यासाठी बसपेक्षा केवळ ३० रुपयेच कमी खर्च असल्यामुळे नांदेड-लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही नगण्य होती.
मुंबई-लातूर रेल्वे पुन्हा लातूपर्यंतच!
मध्य रेल्वेने १ जुलैपासून मुंबई-लातूर सुपरफास्ट गाडी नांदेडपर्यंत नेण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यास लातूरकरांमधून झालेला तीव्र विरोध लक्षात घेऊन रेल्वे विभागाने ही रेल्वे लातूपर्यंतच ठेवण्याचे निश्चित केले आहे.
आणखी वाचा
First published on: 02-07-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai latur railway again till latur