नियोजित कुलाबा ते सीप्झ भुयारी मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर पुढील प्रवासासाठी ‘बेस्ट’च्या बसचा पर्याय सुलभरीत्या मिळावा यासाठी तीन भूमिगत स्थानकांच्या वरील जागेवर बसची स्थानके उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ‘मुंबई मेट्रो रेल्वे कापरेरेशन’ आणि ‘बेस्ट’ हे एकत्ररीत्या काम करणार आहेत.
कुलाबा ते सीप्झ या ३३.५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर तीन मोकळे भूखंड, डेपो आणि महत्त्वाच्या बसस्थानकांजवळून जाणार आहे. शक्य असलेल्या ठिकाणी बेस्ट स्थानके उभारून मेट्रो प्रवाशांची सोय करण्यात येणार आहे. ‘एमएमआरसीएल’ आणि ‘बेस्ट’ एकत्रितरीत्या काम करतील, अशी माहिती ‘एमएमआरसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी यांनी दिली.
मुंबईतील अनेक मोकळे भूखंड ‘बेस्ट’च्या ताब्यात आहेत. बेस्ट सेवा आणि मेट्रो स्थानके एकत्र जोडली जातात त्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. डी. एन. मार्गावरील हुतात्मा चौक, ई मोझेस मार्गावरील सायन्स म्युझियम (सब वे लिंकमार्गे अंबिका मिल बेस्ट स्थानकाला जोडले जातील) आणि सीप्झ स्थानक अशी तीन स्थानके सीप्झ बेस्ट टर्मिनलमार्गे मेट्रोशी जोडले जाणार आहेत.
या तीन बेस्ट स्थानकांखालील भूमिगत भाग ‘एमएमआरसीएल’च्या अखत्यारीत असेल, तर जमिनीवरील भागाचा वापर ‘बेस्ट’ प्रशासन आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी वापरेल. या प्रकल्पासाठी संपूर्ण खर्च ‘एमएमआरसीएल’ उभारणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा