मुंबई परिसरात पायाभूत सुविधा प्रकल्प राबवणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात कंत्राटदारच अधिक ‘पॉवरफुल’ असल्याच्या चर्चेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर येत आहे. वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईच्या पहिल्या मेट्रो रेल्वेचे सरकारी नाव ‘मुंबई मेट्रो लाइन वन’ असे असले तरी हा प्रकल्प राबवणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ने या प्रकल्पाचे नामकरण ‘रिलायन्स मेट्रो’ असे करून टाकले आहे. मेट्रोच्या गाडय़ांवर तसा स्टीकर दिमाखात झळकतो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांनी तो काढण्याबाबत आदेश देऊन आता आठ महिने उलटले तरी ‘रिलायन्स’ने मदान यांच्या आदेशला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.
मुंबईतील पहिली मेट्रो काम सुरू होऊन सात वर्षे उलटली तरी अद्याप सुरू झालेली नाही. ती कधी सुरू होणार याचा निश्चित मुहूर्तही जाहीर झालेला नाही. नवीन वर्षांत ती प्रवासी सेवेत दाखल होईल असे पुन्हा एकदा सांगितले जात आहे. प्रकल्प रेंगाळत असला तरी ‘रिलायन्स’चा ताठा कमी झालेला नाही. या मेट्रोच्या चाचणीचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १ मे रोजी झाले. त्यावेळी मेट्रोच्या डब्यांवर ‘मुंबई मेट्रो वन’ऐवजी ‘रिलायन्स मेट्रो’ असे नाव ठळकपणे झळकत होते.  मेट्रोच्या या अनधिकृत नामकरणाची बाब समोर येताच प्राधिकरणाचे महानगर आयुक्त मदान यांनी या प्रकल्पाचे नाव ‘मेट्रो लाइन वन’ असेच असल्याचे स्पष्ट केले. तसेच रिलायन्स मेट्रो हे नाव काढण्याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. पण आता आठ महिने उलटून गेले तरी ‘रिलायन्स मेट्रो’ हेच नाव कायम आहे. मदान यांच्या आदेशाला जुमानत नसल्याचे ‘रिलायन्स’ने दाखवून दिले.या प्रकरणाकडे मदान यांचे पुन्हा लक्ष वेधले असता, तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.मात्र, या प्रकल्पात आमचा ७४ टक्के वाटा आहे. मग आम्ही ‘रिलायन्स’ हे नाव का नाही झळकवणार, असा उलट सवाल प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना ‘मुंबई मेट्रोवन’च्या अधिकाऱ्यांनी केल्याचे प्राधिकरणातील सूत्रांकडून समजते.

Story img Loader