पालिकेच्या कामगार भरतीमधील लेखी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले १८,९९६ पैकी १३,५१२ उमेदवार गेली चार वर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासन आणि राजकारण्यांनी वेळोवेळी या उमेदवारांना आश्वासनांचे गाजर दाखविले. त्यामुळे आज, उद्याकडे नोकरीसाठी बोलावणे येईल अशा समजुतीत असलेल्या या उमेदवारांचे वयही आता उलटून जाऊ लागले आहे. परिणामी, पालिकेची सूत्रे हाती घेतलेल्या नव्या आयुक्तांना या मंडळींनी साकडे घातले आहे.
पालिकेच्या निरनिराळ्या विभागांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे २००९ मध्ये कामगारांची ३,९१६ पदे भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. या पदासाठी मोठय़ा प्रमाणात अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल २,०८,५६५ अर्ज पात्र ठरविण्यात आले. मात्र रिक्त पदांच्या १५ पट उमेदवारांना वयाच्या ज्येष्ठतेनुसार संधी देण्याचे पालिकेने ठरविले आणि २०११ मध्ये ५८,७४० उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले. या चाचणीत यशस्वी झालेल्या १८,९९६ उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर पालिकेने १८,९६६ जणांची गुणवत्ता यादी तयार केली. गुणवत्ता यादीमधील ३,९१६ उमेदवारांना नोकरी देण्यात आली. प्रतीक्षा यादीमधील उर्वरित १५,०८० जणांना लवकरच नोकरी देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे ही मंडळी खूश होती. मुंबईत हिवताप, डेंग्यूच्या साथीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे प्रतीक्षा यादीमधील ८१५ जणांची वर्षभरातच पालिकेच्या सेवेत भरती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा सथीच्या आजारांनी जोर धरल्याने प्रतीक्षा यादीची विधिग्राह्य़ता शिथिल करून २०१३ मध्ये ७५२ जणांना सेवेत घेण्यात आले. प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना टप्प्याटप्प्याने नोकरी मिळत असल्याने ही मंडळी खूश होती. मात्र शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा देऊन आता चार वर्षे झाली तरी नोकरी मिळत नसल्याने उर्वरित १३,५१२ जण अस्वस्थ झाले आहेत. पालिकेने २००७-०८ मध्ये केलेल्या कामगार भरतीमध्ये ४० पेक्षा कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली. २०१३ मध्ये अभियंत्यांची भरती करताना किमान गुणांची अट शिथिल करण्यात आली. मग आमच्या बाबतीतच असा अन्याय का केला जात आहे, असा सवाल या मंडळींकडून करण्यात येत आहे. आजही पालिकेत मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे मुंबईकरांना पुरेशा नागरी सुविधा मिळू शकत नाहीत. आजघडीला पालिकेतील रिक्त आणि पदोन्नतीद्वारे भरण्यात येणारी चतुर्थश्रेणी कामगारांची अनुक्रमे ९,६९४ व ४,१८१ अशी एकूण १३,८७५ पदे रिक्त आहेत. पालिकेने २००९ मध्ये नोकरभरतीसाठी लाखो रुपये खर्च केले आणि ही प्रतीक्षा यादी तयार केली. आता पुन्हा नव्याने कामगार भरतीची प्रक्रिया करून मुंबईकरांचा पैसा वाया घालविण्याऐवजी या उमेदवारांना सेवेत घ्यावे. त्यामुळे पालिकेचा वेळ आणि पैसा वाचेल आणि वयाची वेस ओलांडण्याच्या बेतात असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळेल.
चार वर्षांपासून १३ हजार यशस्वी उमेदवार प्रतीक्षा यादीतच
पालिकेच्या कामगार भरतीमधील लेखी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले १८,९९६ पैकी १३,५१२ उमेदवार गेली चार वर्षे नोकरीच्या प्रतीक्षेत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-06-2015 at 07:24 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation employee recruitment