पावसाच्या तडाख्याने ‘सच्छिद्र’ झालेले रस्ते आणि उड्डाणपूल आता मुंबईकरांच्या ‘जीवा’वर उठले आहेत. मुंबईत रस्तेअपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र पालिका प्रशासन, नगरसेवक आणि कंत्राटदारांना त्याचे सोयरसुतक नाही. परिणामी ‘खड्डय़ांची मुंबई’ असे नवे बिरुद या शहराला चिकटले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करणे पालिका प्रशासनाला जमले नाही. तसेच मुंबईकरांच्या कळवळ्याचे राजकारण करणारे सत्ताधारी आणि विरोधकांनीही हे फारसे मनावर घेतले नाही. पावसाळ्यापूर्वी खड्डय़ांना मुक्ती देण्याची जबाबदारी पालिकेच्या विभाग कार्यालयांतील कामगारांवर सोपविण्यात आली होती. प्रशासनाची आज्ञा शिरसावंद्य मानून कामगार हाती कुदळ, फावडी, घमेली, कोल्डमिक्स (डांबरमिश्रीत खडी) घेऊन विभाग कार्यालयाच्या हद्दीत फिरत होते. छोटय़ा-मोठय़ा खड्डय़ांमध्ये कोल्डमिक्स टाकून कामगार खड्डेमुक्ती मोहिमेत दंग झाले होते. अर्थात अपेक्षेनुसार पाहिल्याच पावसाच्या तडाख्यात कोल्डमिक्स उखडले आणि रस्ते खड्डय़ांनी भरले. दरम्यानच्या काळात पालिकेने नियुक्त केलेल्या कंत्राटदारांनी संगणक प्रणालीद्वारे सोपविण्यात आलेले खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत करण्याचे काम हाती घेतले. परंतु मुळातच संगणक प्रणालीवर अत्यंत कमी संख्येने खड्डे उपलब्ध झाल्यामुळे रस्ते गुळगुळीत होऊ शकले नाहीत.
काही काळ विश्रांती घेऊन पुन्हा दमदार हजेरी लावलेल्या पावसाने अवघी मुंबापुरी खड्डेमय केली. आता तर उड्डाणपुलांवरही मोठमोठे खड्डे पडले असून वाहतुकीचा वेग मंदावू लागला आहे. त्याचबरोबर पालिका विभाग कार्यालयांतील कामगार आणि कंत्राटदारांनी बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले असून खड्डय़ातील कोल्डमिक्स मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांवर पसरले आहेत. हे खड्डे आणि त्यातून बाहेर रस्त्यावर आलेली बारीक खडी आता दुचाकीस्वारांची कर्दनकाळ बनू लागली आहे. मालाड येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डय़ांमुळे झालेल्या अपघातात अभियंता उमेद शिंदे (२८) यांना प्राण गमवावे लागले. कांदिवली येथील कार्यालयातून काम आटोपून उमेश स्कूटरवरुन घरी निघाला होता. रस्त्यावरील भल्यामोठय़ा खड्डय़ात त्याची स्कूटर आदळली आणि त्याचे अपघाती निधन झाले. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता.
खड्डयामुळे झालेल्या
अपघातातील यापूर्वीचे मृत्यू
४ ऑगस्ट २०११
पोलील हवालदार नितीन पवार यांच्या पत्नीचा मृत्यू. पवार पत्नी श्रद्धा पवार (३८) हिला मोटारसायकलीवर मागे बसवून जात होते. पवईच्या आदि शंकराचार्य मार्गावरील राधाकृष्ण हॉटेलजवळ खड्डय़ामुळे मोटारसायकलीला अपघात झाला. त्यात श्रद्धा खाली पडल्या आणि त्याचवेळी पालिकेच्या डंपरने त्यांना धडक दिली. श्रद्धा पवार यांचा त्यात मृत्यू झाला.
८ ऑगस्ट २०११
सिद्धेश डोके (१९) या तरुणाचा गोरेगाव पूर्व, आरे कॉलनी येथे मृत्यू. मोटारसायकलीवरून जात असताना रस्त्यात आलेला खड्डा चुकविताना त्याचा तोल गेला आणि समोरून येणाऱ्या इंडिकाने त्याला धडक दिली. त्यात सिद्धेशचा मृत्यू झाला.
२९ ऑगस्ट २०१२
नागपाडा येथे राहणारे मोहम्मद अन्सारी (५५) मोटारसायकलीवरून वडाळा येथील बरकत अली नाक्यावरून जात होते. रस्त्यात खड्डा दिसल्याने त्यांनी अचानक स्कूटरला ब्रेक लावला पण मागून येणाऱ्या टँकरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा