इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत असून भारत यामध्ये जगभरात आघाडीवर येऊ पाहात आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये भारत हा तिसऱ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. तर भारतात सर्वाधिक इंटरनेट हे मुंबईत वापरले जात असल्याचेही समोर आले आहे.
मुंबईत इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली असून देशातील सर्वाधिक इंटरनेट वापरकर्ते हे मुंबईत असल्याचे ‘इंटरनेट आणि मोबाइल असोशिएशन ऑफ इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. या वर्षांत सर्वाधिक वाढ ही कोलकातामध्ये ४७ टक्के इतकी झाली आहे. असे असले तरी इंटरनेट वापरकर्ते हे मुंबईत जास्त आहेत. यातही मोबाइलमधून इंटरनेटचा वापर करणाऱ्यांच्या संख्या सातत्याने वाढत असल्याचे ‘इंटरनेट आणि मोबाइल असोशिएशन ऑफ इंडिया’ने आपल्या सर्वेक्षणात नमूद केले आहे. ‘वॉट्स अ‍ॅप’ आणि ‘बीएमएम’मुळे हा इंटरनेटचा वापर वाढल्याचा अंदाजही सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
भारतात सात कोटी ४० लाख लोक इंटरनेट वापरत आहेत. यामुळे भारताने जपानला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकवर चीन आहे. कॉमस्कोर या इंटरनेट जगतातील हालचालींवी लक्ष ठेवणाऱ्या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून यामध्ये ही बाब लक्षात आली आहे. देशात कार्यालयांमध्ये किंवा घरी इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची अधिकृत आकडेवारी ही सात कोटी ३९ लाख इतकी आहे. यात आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे यातील ७५ टक्के इंटरनेट वापरकर्ते हे पस्तिशीच्या आतील आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये महिलांचे प्रमाणही वाढले असून ३५ ते ४४ वयोगटातीलमहिला सर्वाधिक इंटरनेटचा वापर करत असल्याचे लक्षात आले आहे. तर ऑनलाइन ब्लॉगिंगमध्ये महिलांचे प्रमाण हे ४८ टक्कय़ांनी वाढले आहे. यातील अहवालात नमूद करण्यात आलेली आणखी एक बाब म्हणजे देशात इंटरनेटवर व्हिडीओ पाहणाऱ्यांचे प्रमाण हे २७ टक्कय़ांनी वाढले असून पाच कोटी ४० लाख वापरकर्ते इंटरनेटचा वापर व्हिडीओ पाहण्यासाठी करतात.

Story img Loader