एका पत्रकाराची हत्या करण्याचे आदेश देणे रवी पुजारीला चांगलेच भोवले आहे. आतापर्यंत त्याच्याकडे फारशा गांभीर्याने न बघणारे मुंबई पोलीस आता मात्र कमालीचे सक्रिय झाले आहेत. पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी पुजारी टोळी पूर्णत: नेस्तनाबूत करण्याचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्यानंतर पोलिसांनी ‘मिशन पुजारी टोळी’ सुरू केले आहे. आतापर्यंत या टोळीतील जुन्या व नव्या अशा सुमारे सव्वाशे गुंडांची यादी तयार करून त्यांचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईला संघटित गुन्हेगारी टोळ्यांची दहशत नवी नाही. परंतु ठरवले तर संघटित गुन्हेगारीही ठेचून काढता येते हे पोलिसांनी १९९८ ते २००२ या काळात तब्बल ३०० हून अधिक गुंडांना ठार करून दाखविले होते. त्यानंतर संघटित गुन्हेगारीचा कणा पार मोडला होता. गेल्या दशकभरात संघटित गुन्हेगारी टोळ्या पुन्हा डोके वर काढू शकल्या नव्हत्या. अधूनमधून रवी पुजारीच सक्रिय होता. परंतु गोळीबार करणे वा धमकावणे यापुरताच तो मर्यादित होता. परंतु मालमत्ता विभागाचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे, नीतीन पाटील आदींच्या पथकाने पुजारी टोळीच्या काही गुंडांना अटक केल्यानंतर एका पत्रकाराची हत्या करून दहशत माजविण्याचा पुजारीचा डाव असल्याचे पाहून हादरलेल्या पोलिसांनी आता हे मिशन गांभीर्याने घेतले आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त सदानंद दाते यांनीही पुजारी टोळीला आता डोके वर काढू न देण्याचा विडा उचलला आहे. संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी दोन हात करणारे काही वरिष्ठ अधिकारी सध्या गुन्हे अन्वेषण विभागात असून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनीही एका बैठकीत पुजारी टोळीला संपवून टाकण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी संपूर्ण पोलीस दलच आता या टोळीच्या मागे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.     
गुन्हे अन्वेषण विभागच नव्हे तर पोलीस ठाण्यांनाही पुजारी टोळीतील हस्तकांची माहिती पुरविण्यात आली आहे. यापूर्वी पुजारी टोळीकडून ज्यांना धमक्या आल्या त्या प्रकरणांचाही आढावा घेतला जात आहे. पुजारीकडून नव्याने खंडणीसाठी दूरध्वनी आल्यानंतरही त्याची गंभीर दखल घेत संबंधितांना संरक्षण पुरविण्याचे पोलिसांनी ठरविले आहे.
  १९९८-२००० या काळात संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध जोरदार मोहिम उघडण्याचे आदेश देण्यात आले होते. काहीही करा पण गुंडांना ठेचा. त्यावेळी चकमकींनी कहर गाठला. आता काळ बदलला आहे. आताही पुन्हा तेच आदेश आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही टोळी नेस्तनाबूत झाली पाहिजे. काहीही करा. – गुन्हे अन्वेषण विभागातील एक अधिकारी.

Story img Loader