सचिन अहिर यांची घोषणा प्रत्यक्षात येणार का?
परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एसटी महामंडळाच्या कार्यालयाला दिलेल्या पहिल्याच भेटीवेळी मोठा गाजावाजा करत ‘मुंबई-पुणे महिला विशेष शिवनेरी’ची घोषणा केली. मात्र एसटीतील अनेक वरिष्ठ अधिकारी या महिला विशेष शिवनेरीबद्दल उदासीन आहेत. नफ्यातोटय़ाचा विचार करता मुंबई-पुणे महिला विशेष शिवनेरीची फेरी व्यवहार्य ठरणार नाही, असे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. तरीही राज्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केल्याने अशा गाडीच्या शक्यतेची पाहणी एसटी महामंडळातर्फे सुरू आहे.
शिवनेरी गाडय़ांना भरभरून प्रतिसाद मिळतो. मुंबई, बोरिवली आणि ठाणे येथून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनी शिवनेरीला पसंती दिल्याने या गाडय़ा सदैव फायद्यात चालतात. याचाच अंदाज घेत परिवहन राज्यमंत्र्यांनी ‘मुंबई-पुणे महिला विशेष शिवनेरी’ची घोषणा केली.
दादर, बोरिवली, ठाणे येथून पुण्याकडे दर दिवशी शिवनेरीच्या १६८ फेऱ्या होतात. त्यापैकी ११६ फेऱ्या केवळ दादर टीटी येथून सुटतात. एका फेरीत दर दिवशी सरासरी ३०-३५ प्रवासी प्रवास करतात. शिवनेरीत जास्तीत जास्त प्रवासी संख्या ४५ आहे. ती गाडी फायद्यात चालवण्यासाठी किमान ३५ प्रवासी संख्या असणे आवश्यक आहे. गर्दीच्या वेळीही एका गाडीत सरासरी दहापेक्षा जास्त महिला प्रवासी नसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी खास एक गाडी चालवणे तोटय़ात जाणारे आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर          सांगितले.
दादर-पुणे शिवनेरीचे तिकीट ३९० रुपये आहे. एक गाडी संपूर्ण भरून गेली, तर त्या गाडीतून एसटीला १७, ५५० रुपये उत्पन्न मिळते. यातील महिलांची संख्या जास्तीत जास्त १०-१५ एवढीच आहे. त्यामुळे केवळ ६००० रुपयांसाठी एक अख्खी शिवनेरी मुंबई-पुणे मार्गावर चालवणे व्यवहार्य नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र परिवहन राज्यमंत्र्यांनी सर्व प्रसारमाध्यमांसमोर घोषणा केल्यानंतर आता एसटीला त्या शक्यतेची पाहणी करावी लागणार असल्याचेही तो म्हणाला.