पावसाळ्यात रेल्वेची वाहतूक विस्कळीत होणे नित्याचेच आहे. यंदाही पहिल्या पावसाच्या दणक्यामध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीच; पण मार्गात पाणी भरण्याची नवी ठिकाणेही निर्माण झाली. मात्र रेल्वे प्रशासनाला याबाबत कायमस्वरूपी उपाय योजना करावीशी वाटत नाही.
यंदाच्या पावसाचा पहिला दणका शुक्रवार सायंकाळी रेल्वेला बसला. रात्रीतच रेल्वे मार्गामध्ये पाणी भरले आणि वाहतूक विस्कळीत झाली. भांडुप, नाहूर, कांजुरमार्ग, घाटकोपर आणि विक्रोळी येथे पाणी भरल्याने अखेर वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. रेल्वेच्या दाव्यानुसार वाहतूक केवळ धीमी करण्यात आली होती. कुर्ला, माटुंगा, शीव, विद्याविहार, मुलुंड, भांडुप आणि कळवा ही ठिकाणे मध्य रेल्वेची नेहमीची पाणी भरण्याची ठिकाणे आहेत. काही ठिकाणी रेल्वेने मार्ग काही प्रमाणात वर उचलला असला तरी यंदाही येथे पाणी भरलेच. याचे प्रमुख कारण मार्गाशेजारून जाणाऱ्या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही.
पावसाळ्यापूर्वी पालिका, रेल्वे प्रशासन यांच्या झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे मार्गातील नाल्यांची सफाई करण्याबाबत चर्चा झाली होती. रेल्वेच्या हद्दीतील नाले सफाई पालिका करणार नसली तरी त्यांनी त्यासाठी रेल्वेला आर्थिक सहाय्य दिले होते. असे असूनही रेल्वेने आपल्या हद्दीतील नालेसफाईकडे दुर्लक्ष केले परिणामी रेल्वे मार्गामध्ये पाणी साठले. भांडुप, कुर्ला, घाटकोपर, शीव या नाल्यांची सफाई अद्याप बाकी असून अन्य ठिकाणी गाळ काढून तो नाल्याशेजारीच ठेवण्यात आला आहे. परिणामी पहिल्याच पावसात सगळा गाळ नाल्यात पुन्हा वाहून गेला आहे. नालेसफाईचा प्रश्न मध्य रेल्वेला ज्या प्रमाणात भेडसावतो आहे त्या प्रमाणात पश्चिम रेल्वेला भडसावत नाही. याचे कारण पश्चिम रेल्वेवर मोठे नाले नाहीत. परिणामी मध्य रेल्वेइतकी नालेसफाई पश्चिम रेल्वेला करावी लागत नाही.