गांधी जयंतीची हक्काची सुट्टी घरी घालवण्याऐवजी बहुसंख्य मुंबईकरांनी गुरुवारी सकाळी हाती झाडू घेतला होता. त्यामुळे इतर वेळी पानाच्या थुंकी, कागद आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे विद्रुप झालेली सार्वजनिक स्थळे, रेल्वे आणि बस स्थानके दुपारपर्यंत चकाचक झाली होती. मध्य रेल्वेच्या सीएसटी आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकांवर महाव्यवस्थापकांनी रेल्वे कर्मचारी, प्रवासी, सामाजिक  संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर रेल्वेच्या सर्व स्थानकांवर सफाई मोहीम हाती घेण्यात आली. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनीही गोरेगाव, मुंबई सेंट्रल, चर्चगेट, सीएसटी या स्थानकांना भेट दिली. स्वच्छतागृहांमध्येही त्यांनी पाहणी केली. रेल्वे प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाची शौचालये पुरवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले.
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनीदेखील मुंबई सेंट्रल येथील स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनीही खार स्थानकावर भेट देऊन स्वच्छता मोहिमेत स्वत:चा वाटा उचलला.  ठाणे, कुर्ला, दादर, परळ, घाटकोपर, सीएसटी, चर्चगेट, अंधेरी, बोरीवली अशा प्रमुख स्थानकांसह सर्व स्थानकांच्या आत-बाहेर स्वच्छतेसाठी सकाळपासून कर्मचारी झटत होते. त्यांना प्रवासी, प्रवासी संघटना, विद्यार्थी तसेच लायन्स क्लब, ग्रीन पीस, मानव सेवा संघ यासारख्या सामाजिक संघटनांचीही मदत लाभली.
शाळा भरल्या
स्वच्छता मोहिमेसाठी सुटी रद्द करण्याचा वाद रंगला असला तरी बहुतांश शाळांमध्ये स्वच्छता मोहिमेसाठी विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. शाळेच्या आवाराची स्वच्छता करून स्वच्छतेची शपथ घेऊन विद्यार्थी आपल्या परिसरात स्वच्छतेचा संदेश घेऊन परतले. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही विविध सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. रेल्वे स्थानकांवर गांधीजींच्या रूपात जाऊन स्वच्छता यात्राही काढण्यात विद्यार्थ्यांचा पुढाकार होता. एनएसएसच्या अनेक विद्यार्थ्यांनी मुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन स्वच्छता उपक्रमात भाग घेतला.
पालिकेचा स्वच्छतेचा टिळा
रेल्वे स्थानकांवर सर्वत्र स्वच्छतेही मोहीम हाती घेतली असली तरी सर्व शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेने मात्र केवळ स्वच्छतेचा टिळा लावला. महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत पालिकेच्या निवडक कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेनऊ वाजता स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. मात्र दररोज शहराचे रस्ते साफ करणाऱ्या पालिकेने गुरुवारी इतर विशेष कार्यक्रम हाती घेतले नव्हते.
सिताऱ्यांचा थंडा प्रतिसाद
दरवेळी कोणत्याही प्रश्नावर भाष्य करण्यासाठी किंवा ट्विटरवरुन चिवचिवाट करण्यात अग्रेसर असणारे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील आणि चित्रपटसृष्टीमधील कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘स्वच्छता अभियान’ मोहिमेबद्दल फारसे उत्सुक दिसले नाहीत. आमिर खान, प्रियांका चोप्रा, सचिन तेंडुलकर यांसारखे काही सेलेब्रिटीज वगळता इतर कोणीही या मोहिमेची जास्त दखल घेताना दिसले नाही. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटरवरुन सचिन तेंडुलकर, प्रियांका चोप्रा, सलमान खान, आमिर खान आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकारांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. प्रियांका आणि सचिनने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. मोहिमेच्या शुभारंभाला दिल्लीत पंतप्रधानांसोबत उपस्थित राहून आमिर खानने या मोहिमेला पाठिंबा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा