* ‘बीएमडब्ल्यू’ आयोजित चर्चासत्रात सूर
* ‘मुंबईतील बसप्रवाशांची संख्या ४५ लाखांवरून ७० लाखांवर जायला हवी’
मुंबईतील वाहतुकीची समस्या नियंत्रणात आणण्यासाठी एका विशिष्ट भागांत रस्त्यांवर बससाठी विशेष मार्गिका ठेवण्याचा (बस रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम) प्रयोग करून पाहण्याची गरज आहे. प्रयोगाच्या यशापयशावरून त्याचे भवितव्य ठरवता येईल, पण एकदा तरी हा प्रयोग करायला हवा, असे मत मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर बीएमडब्ल्यू या मोटारकार उत्पादन कंपनीतर्फे एक चर्चासत्र झाले. पायाभूत सुविधा-वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक दातार, सुधीर बदामी, गीतम तिवारी, माधव पै, रेचल स्मिथ, विवेक फणसळकर यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. विशेष म्हणजे एका मोटारकार उत्पादक कंपनीने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात बहुतांश सर्व वक्त्यांनी मुंबईतील वाहतूक समस्येचे मूळ हे मोटरकारच्या भरमसाट वापरात असल्याचे सांगत मोटारकारविरोधी सूर लावला. बससारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सायकल वापरास प्रोत्साहन मिळेल अशा उपाययोजना करण्याची गरजही अनेकांनी व्यक्त केली. मुंबईत आजमितीस २० लाख खासगी वाहने आहेत. त्यात वाढ होत आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही प्रामुख्याने चारचाकी वाहनांमुळे होत आहे. त्यामुळे बससाठी विशेष मार्गिका रस्त्यावर ठेवण्याचा प्रयोग व्हायला हवा. मुंबईभर एकाच वेळी प्रयोग न करता एका विशिष्ट भागातील रस्त्यांवर तो करता येईल. त्याचे फलित पाहून या प्रयोगाच्या भवितव्याचा विचार करता येईल. पण एकदा तरी हा प्रयोग व्हायला हवा, असे आग्रही मत फणसळकर यांनी मांडले. मुंबई महानगरात रोज सुमारे ४५ ते ५० लाख लोक बसचा वापर करतात. हे प्रमाण ७० लाखांपर्यंत नेण्याची गरज आहे. तसे झाल्यास खासगी मोटारकार-टॅक्सीसारख्या चारचाकी वाहनांची संख्या मर्यादित राहून वाहतूक सुरळीत राहू शकते, अशी आकडेवारी या वेळी तज्ज्ञांनी मांडली.   

Story img Loader