गेल्या तीन वर्षांत मलेरियाचे रुग्ण व मृत्यू यांची संख्या कमी झाली असली तरी महानगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षीही मलरिया हा डेंग्यूपेक्षा अधिक जीवघेणा ठरला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत मलेरियाने १७ बळी घेतले आहेत तर डेंग्यूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १२ आहे.
जानेवारी ते सप्टेंबर २०१३ या काळात मलेरियाचे ७९६० रुग्ण आढळले. पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यात रुग्णांची संख्या ४४८१ होती. मलेरियामुळे यावर्षी झालेल्या १७ मृत्यूंपकी ११ मृत्यू जुल ते सप्टेंबर या काळात झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यातील मलेरिया मृत्यूची संख्या उपलब्ध नाही. याच तुलनेत वर्षभरात डेंग्यूचे ६९८ रुग्ण आढळले असून जून ते सप्टेंबर या महिन्यात ३५३ रुग्ण आढळले. ऑगस्ट व सप्टेंबर या काळात डेंग्यूमुळे सहा मृत्यू झाले आहेत. ऑक्टोबरमधील डेंग्यूचे सहा संशयित मृत्यू आहेत. मात्र त्यांच्या मृत्यूंचे निदान अजून स्पष्ट झालेले नाही. ही सर्व पालिकेची अधिकृत आकडेवारी आहे. मलेरिया आणि डेंग्यू रुग्णांची खासगी रुग्णालयातील संख्या व संशयित मृत्यू यांचे प्रमाण अधिक असू शकते. मलेरियाचे प्रमाण व मृत्यू हे डेंग्यूपेक्षा अधिक असूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत व विशेषत: ऑक्टोबरमध्ये डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढल्याने त्याची चर्चा अधिक होत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डेंग्यूविषयी योग्य ती उपाययोजना केली गेली पाहिजे. मात्र त्याचवेळी मलेरियाला कमी धोकादायक समजले जाऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘मलेरिया रुग्णांची संख्या व मृत्यू कमी झाले असले तरी डेंग्यूच्या तुलनेत आजही मलेरिया हा अधिक प्राणघातक ठरतो आहे. मात्र गेल्या काही वर्षांपेक्षा डेंग्यूमध्ये वाढ झाल्याने त्याविषयी अधिक चर्चा होताना दिसते. मुंबईसारख्या शहरात व देशात साथीच्या रोगांमध्ये टीबी हा सर्वाधिक जास्त चिंतेचा विषय ठरायला हवा, ’ असे आरोग्य विभागातील एका अधिकारयाने सांगितले. गेली पाच वष्रे मुंबईत दरवर्षी टीबीचे सुमारे तीस हजार रुग्ण आढळत आहेत.
‘गेल्या चार वर्षांत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या १४५ वरून १७ वर आली आहे. मलेरियाच्या रुग्णांची संख्याही लक्षणीयरित्या कमी झाली आहे. आजारामुळे कोणाचाही मृत्यू होऊ नये, ही आदर्श स्थिती आहे. त्या स्थितीकडे जाण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर म्हणाल्या.

Story img Loader