मुंबई विद्यापीठाचा शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापिका डॉ. वासंती कधीरावण यांची या विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीने कधीरावण यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस विद्यापीठाकडे केली होती. समितीने शिफारस केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी विद्यापीठाने त्यांची नियुक्ती विभागप्रमुख पदी केली. या नियुक्तीला याच विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. तक्रार निवारण समितीच्या शिफारशीप्रमाणे विद्यापीठाने प्राध्यापिकेविरुद्ध कारवाई करणे अपेक्षित असताना त्यांची पदोन्नती करुन विद्यार्थ्यांवर घोर अन्याय केल्याचे, पत्र विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना पाठविले आहे. त्यामुळे आम्ही प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याचेही विद्यार्थ्यांनी पत्रात नमूद केले आहे. कधीरावण यांना पदावरुन त्वरीत हटवून आमच्या शैक्षणिक मुल्यांकनापासून त्यांना दूर ठेवावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी कुलगुरुंकडे केली आहे.
शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यामधील वाद प्रचंड गाजला होता. विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधील वादामुळे प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचा प्रकार मुंबई विद्यापीठ आणि शिक्षण क्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. हे प्रकरण विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीकडे पोहचले. समितीने तक्रारदार विद्यार्थी आणि डॉ. प्राध्यापक वासंती काधीरावन, डॉ. प्राध्यापक मनोहर माने आणि प्राध्यापक जसबीर कौर यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानुसार समितीने शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रती असणारी वागणूक आणि वर्तणूक शिक्षकी पेशाला साजेशी नसल्याचा ठपका ठेवला. तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि कायदेशीर दावे प्रतिदावे यांचा विचार केल्यास सदर शिक्षकाविरुद्ध विद्यापीठ प्रशासनाने शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची शिफारस विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. कधीरावण यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ प्रहार विद्यार्थी संघटना राज्यपाल आणि कुलगुरूंकडे निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मनोज टेकाडे यांनी दिली. विश्वासार्हता गमावलेल्या प्राध्यापकांना विभागप्रमुख पद देताना विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला नसल्याचा आरोपही टेकाडे यांनी केला आहे.