येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर देशात किंवा राज्यात कोणाचेही राज्य येऊ देत, पण सोमवारी मुंबईच्या रस्त्यांवरच नाही, तर गल्लोगल्ली फक्त रंगांचेच साम्राज्य पसरले होते. विशेष म्हणजे यंदा मुंबईकरांनी धुळवडीसाठी पाण्याचा अपव्यय टाळत कोरडय़ा रंगांची उधळण करत ‘होली है’चा नारा दिला. दरवर्षी रंगाच्या पाण्यात न्हाऊन धुंद होणाऱ्या मुंबईकरांनी आता हळूहळू पाण्याचा माफक वापर करण्यास सुरुवात केली असून, यंदा धुंद होण्यासाठी डीजेच्या तालावर ठेका धरला. आपापल्या वाडय़ांमध्ये, चाळींमध्ये, सोसायटय़ांत रंग खेळून झाल्यावर नाक्यावरच्या वडेवाल्याकडे वडापावच्या घाऊक ऑर्डरी गेल्या आणि या ‘रंगरावां’ची स्वारी बाइकवरून मुंबईच्या रस्त्यांवर उधळली.
मुंबईच्या गल्ल्यांमध्ये रविवारी दुपारपासूनच होळीची लगबग सुरू होती. होळीसाठी लागणारी लाकडे गोळा करण्यापासून जवळच्या गोठय़ातून पेंढा आणण्यापर्यंत सगळी कामे करण्यात तरुणाई आघाडीवर होती. रविवारी रात्री उशिरा पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी आणि नारळाचा नैवेद्य दाखवून होळीची पूजा करण्यात आली आणि एक एक होळ्या पेटायला लागल्या. होळ्या पेटल्यानंतर त्याभोवती जमलेल्या लोकांनी मारलेल्या बोंबांनी मुंबई दणाणून गेली. यंदा अगदी थोडय़ा थोडय़ा अंतरावर होळ्या पेटल्याने रविवारी रात्री मुंबई आणि परिसर धूसर झाला होता.
रंगोत्सवात पाण्याच्या अपव्ययाला ‘गुडबाय’?
सोमवारी सकाळी आळोखेपिळोखे देत मुंबईकर रंगांच्या पिशव्या घेऊन घराबाहेर पडले. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच खाली उतरत एकमेकांना रंग लावत धुळवड खेळण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे गेल्या वर्षी अनेक संस्थांनी धुळवडीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले होते. गेल्या वर्षीही या आवाहनाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला होता. दरवर्षी सोसायटय़ांमध्ये पाण्याचे पाइप लावून होळी खेळली जाते, त्यावर नियंत्रण आले होते. यंदाही मुंबईकरांनी तोच कित्ता गिरवला. अनेकांनी पाण्याचा अपव्यय करण्याऐवजी सुक्या रंगांची उधळण करतच धुळवड साजरी केली. त्यासाठी खास नैसर्गिक रंगांचीही खरेदी करण्यात आली. दरवर्षी धुळवडीच्या दिवशी मुंबईतील रस्ते पाण्यात मिसळलेल्या रंगांमुळे ओले आणि बरबटलेले असतात. मात्र यंदा लोकांनी सुक्या रंगाला पसंती दिल्याने रस्त्यांवर रंगांचा हलकाच शिडकावा होत होता.
डीजेचा ताल जोरात..
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीपासून ते बोळातल्या सत्यनारायणाच्या पूजेपर्यंत सगळीकडे थिरकणारा डीजेचा ताल धुळवडीच्या दिवशीही घुमला. व्यावसायिक डीजेंपासून ते गल्लीतल्या हौशी डीजेंपर्यंत अनेकांनी मुंबईच्या अनेक सोसायटय़ा, चाळी, वाडय़ा आणि गल्ल्यांमध्ये ताल धरला होता. गाणे सुरू झाले की थंडाईचा आस्वाद घेत त्या तालावर पावले थिरकायला सुरुवात व्हायची. हाताच्या मुठींमध्ये रंग घेऊन गाण्यातील सम आली की हातातील रंग हवेत उधळायचा, अशा थाटात मुंबईकरांनी आसमंत रंगीबेरंगी केला.
वडापाव आणि थंडाई
रंग खेळून थकलेल्या ‘रंगरावां’ची पावले आपसूकच नाक्यावरच्या वडेवाल्याकडे वळली. वडापावच्या गाडय़ांवर, दुकानांसमोर रंगलेली तोंडे घेऊन अनेक जण आपल्या पार्सलची वाट पाहत होते. तर थंडाई विकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हलवायांच्या दुकानांसमोरही अशीच गर्दी होती. सकाळी वातावरणही काहीसे ढगाळलेले असल्याने वातावरणात फारसा उष्मा नव्हता. दहानंतर उन्हाचा तडाखा बसू लागल्यावर थंडाईचे घोट घेत लोकांनी जीव शांत केला. अनेक सोसायटय़ांमध्ये तर धुळवडीच्या निमित्ताने दुपारचे जेवणच ठेवले होते. मात्र धुळवड सोमवारी आल्याने मांसाहारी खवय्यांची चांगलीच पंचाईत झाली. पण या अस्सल खवय्यांनी व्हेज बिर्याणी, छोले, पावभाजी अशा पदार्थावर ताव मारत चमचमीत मांसाहाराची हौस भागवली.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना होळी उत्सवातून मदत
आपल्या कलेतून नेहमीच वास्तवाचे चित्रण करणाऱ्या मराठी चित्रपटक्षेत्रातील कलाकारांनीही एकत्र येत होळी साजरी केली. अवधूत गुप्ते, वैभव मांगले, सुशांत शेलार, संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, स्वप्निल बांदोडकर, जयवंत वाडकर, अरुण कदम असे अनेक कलाकार शिवाजी पार्कजवळील वनिता समाजच्या बाजूच्या एका मैदानात जमले होते. नाच आणि गाणी यांच्यासह रंग आणि पाण्याची उधळण करत या कलाकारांनी होळी साजरी केली. इतर वेळी आपल्या त्वचेबाबत खूपच जागरूक आणि संवेदनशील असलेले कलाकार रंगांची उधळण मात्र मुक्तहस्ताने करत होते. थंडाई, मिठाई आणि चाट यांचा आस्वाद घेत या सर्वानीच धूमशान केले. आमच्या कलाकृतींमधून आम्ही सामाजिक भान जपण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. मात्र आमच्या उत्सवातूनही आम्ही ते भान जपले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही कलाकारांनी एक निधी जमविला आहे. हा निधी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे, असे अवधूत गुप्ते याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा