मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात १ ऑक्टोबरपासून वाढ होत असल्याचे जाहीर होताच रोज खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी उसळली आहे. खड्डय़ांमुळे दूरवस्था झालेल्या उड्डाणपुलांसाठी का म्हणून वाढीव टोल द्यायचा? इतक्या वर्षांत वाहनसंख्या भरमसाठ वाढली. मग टोलच्या दरात वाढ करण्याची गरजच काय? टोलवसुलीत अजिबात पारदर्शकता नाही, नुसती लूट सुरू आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर मुंबईत येताना टोल आकारणी समजण्यासारखी आहे पण बाहेर जाताना कशासाठी, असे अनेक सवाल संतप्त वाहनधारक विचारू लागले असून ऐन विधानसभा निवडणुकीत यावरून मुंबई-ठाणे-नवी मुंबईची हवा तापण्याची चिन्हे आहेत.मुंबईत मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि एलबीएस मार्ग असे पाच टोलनाके आहेत. मुंबईत ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून या पाच ठिकाणी ‘मुंबई एन्ट्री पाँइंट लि.’ या जयंत म्हैसकर यांच्या कंपनीमार्फत टोलवसुली केली जाते. राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात तीन वर्षांनी वाढ होते. आता १ ऑक्टोबर पासून टोलच्या दरात वाढ होत आहे.
आम्ही कधीही टोलआकारणीस विरोध केलेला नाही. मात्र टोलआकारणीत पारदर्शकता नाही हे सत्य आहे आणि पारदर्शकता असावी हाच आमचा आग्रह आहे. रोज किती वाहने गेली, किती टोल आकारणी झाली आणि आता शिल्लक किती यासारख्या गोष्टी वाहनचालकांना समजायला हव्यात. टोलवसुलीत पारदर्शकता आणणे हाच उपाय आहे, असे अशोक दातार यांच्या ‘मुंबई एन्वायरन्मेंटल सोशल नेटवर्क’ या संस्थेने नमूद केले.
विकतचे दुखणे
दररोजचा टोल परवडत नसल्यामुळे महिन्याचा पास काढण्याकडे आमचा कल असतो. पास काढल्यामुळे टोलचे गणित काही प्रमाणात कमी होते. मात्र, टोलनाक्यांवर होत असलेल्या कोंडीमुळे इंधनाचा खर्च दुपटीने वाढू लागला आहे. सातत्याने इंधनाचे दर वाढत असताना सुलभ प्रवासाचा पर्याय प्रवाशांपुढे असणे गरजेचे आहे. मात्र टोलही भरायचा आणि रांगांमध्ये ऊभे राहून इंधन वाया घालवायचे, हे विकतचे दुखणे आहे. माझा इंधनावरील महिन्याचा खर्च तब्बल दीड हजार रुपयांनी वाढला आहे. पंकज माने, वाशी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा