मुंबईतल्या सुमारे ८५ टक्के टॅक्सींच्या परवान्यांवरील पत्ते चुकीचे किंवा अपुरे असल्याचे आढळून आले असून या टॅक्सींचा नवा पत्ता शोधून काढणे जिकिरीचे झाले आहे. टॅक्सीचालकांच्या विरोधात तक्रार करण्यात आली टॅक्सीचालकांना पाठवायची नोटीस परत येण्याचे प्रकारही काहीवेळा घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. चुकीच्या किंवा अपुऱ्या पत्त्यामुळे अनेकदा टॅक्सीचालकांच्या विरोधातील गुन्’ााचा तपासही अर्धवट राहण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाच्या नियमामुळेच नवा पत्ता बदलण्याची सुविधा उपलब्ध नाही आणि किचकट प्रक्रिया राबविण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा परिवहन विभागाकडे नाही.
मुंबईत सुमारे ४१ हजार टॅक्सी धावतात. या टॅक्सींच्या परवान्यांवर नोंदणीच्या वेळी देण्यात आलेलेच पत्ते आहेत. दरवर्षी टॅक्सींना फिटनेस प्रमाणपत्र घेताना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येते. मात्र त्यावेळी त्या टॅक्सींचे अथवा टॅक्सीचालकांचे पत्ते तपासण्याची वेगळी यंत्रणा नसल्यामुळे नोंदणीच्या वेळी असलेले पत्ते योग्य आहेत किंवा नाहीत, याचीच केवळ तपासणी केली जाते. यामुळे अनेकदा टॅक्सीचालकाने आपला निवासाचा पत्ता काही कारणामुळे बदलला असला तरी त्याची नोंद करण्यासाठी असलेली प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने कोणीही पत्ता बदलल्याचे सांगत नाही. परिणामी जुन्याच पत्त्यावर टॅक्सींची नोंद राहते. अर्थात एखादा गुन्हा संबंधित टॅक्सीचालकाने केला आणि त्याच्याविरोधात तक्रार झाली तर मात्र त्याला शोधून काढणे कठीण होते. परिवहन विभागाने २००८ मध्ये सर्व टॅक्सीचालकांना त्यांच्या निवासाच्या पत्त्यांचे पुरावे मागितले होते. मात्र त्यानंतर आजतागायत असे पुरावे मागण्यात आलेले नाहीत. त्यापूर्वी टॅक्सीचालकांना केवळ एक शपथपत्र देऊन आपला पत्ता बरोबर असल्याचे सांगावे लागत होते.
परिवहन विभागाच्या म्हणण्यानुसार जुनेच पत्ते असलेल्या अशा टॅक्सींचे प्रमाण ६० टक्क्यांच्या आसपास आहे. पत्ता बदललेल्या टॅक्सीचालकाच्या विरोधात काही तक्रार आली असेल तर ज्यावेळी तो टॅक्सीचालक आपले वार्षिक फिटनेस प्रमाणपत्र घ्यायला येतो किंवा टॅक्सी परवान्याचे नूतनीकरण किंवा त्याचा वाहन परवाना नूतनीकरण करण्यासाठी येतो तेव्हाच त्याच्यावर संबंधित गुन्ह्याची नोटीस बजावली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. मोटार वाहन कायद्यातील नियमानुसार एखाद्या टॅक्सीची नोंद ज्या विभागीय प्रादेशिक परिवहन विभागात झाली असेल त्याला पत्ता बदलला तरी त्याच विभागामध्ये त्याच्या परवान्याचे नूतनीकरण किंवा फिटनेस प्रमाणपत्र घेता येऊ शकते. परिणामी त्याचा पत्ता बदलला तरी त्याला जुनाच पत्ता ठेवणे अपरिहार्य होते.