ठाणे महापालिका क्षेत्रातील इतर भागांच्या तुलनेत मुंब्रा भागातून मालमत्ता कराची सर्वात कमी वसुली झालेली असतानाही त्या भागात कारवाई करण्यात येत नाही. याउलट, ज्या भागातून वसुली जास्त होत आहे, त्या भागातच मालमत्ता थकविणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून मुंब्रा भागाला झुकते माप देण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत केला. या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरणही देण्यात आले. मात्र, त्यावर शिवसेना सदस्यांचे समाधान झाले नाही. उलट ते अधिकच आक्रमक झाल्याने अखेर स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी महापालिका प्रशासनाला मुंब्रा भागात कारवाई करण्याचे आदेश दिले.
ठाणे महापालिका प्रभाग समितीतील विशेष पथके मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकविणाऱ्यांविरोधात कारवाई करीत असून त्यामध्ये त्यांची नळजोडणी तोडून मालमत्ता ताब्यात घेत आहेत.
या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी स्थायी समितीच्या सभेत काही मुद्दे उपस्थित करून कारवाईविरोधात आक्षेप नोंदविला. इमारतीतील १५ जण बिले भरतात, तर पाच जण बिले भरत नाहीत. या पाच जणांवर कारवाई करण्याऐवजी महापालिका प्रशासन बिले भरणाऱ्यांविरोधातही कारवाई करीत आहे, असा आरोप पवार यांनी केला.
या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र त्यावर ते समाधानी झाले नाहीत. त्यामुळे सभापती फाटक यांनी बिले न भरणाऱ्यांविरोधातच त्वरित कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले.
दरम्यान, नारायण पवार यांनी उपस्थित केलेल्या मालमत्ता वसुलीच्या मुद्दय़ाला धरून शिवसेनेच्या सदस्यांनी मुंब्य्राला लक्ष्य केले. ठाणे महापालिका क्षेत्रातील नौपाडा, वागळे, कोपरी, घोडबंदर, कळवा आदी भागांतून मालमत्ता कराची वसुली ८० ते ९० टक्के झाली आहे. मात्र, मुंब्रा भागातून केवळ २७ टक्केच वसुली झाली असून या भागात महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी विचारणा सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली.
त्यावर मुंब्रा भागातील स्थानिक नगरसेवकांसोबत अधिकाऱ्यांनी बैठक घेतली असून त्यांच्यामार्फत मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. तसेच मालमत्ता कर भरावा यासाठी शिबिरे घेण्यात येणार असून महापालिकेची पथके वसुलीसाठी फिरणार आहेत, असे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले. मात्र, त्यावर शिवसेना सदस्यांचे समाधान झाले नाही, उलट ते अधिकच आक्रमक झाले. मालमत्ता करातून महापालिकेचे महसुली उत्पन्न वाढते, त्यातूनच शहराची विकासकामे होतात. मात्र, मुंब्रा भागातून वसुली होत नसतानाही त्या भागात यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करण्यात आली आहे, असा मुद्दा म्हस्के यांनी मांडला. तसेच महापालिका क्षेत्रातील वागळे, नौपाडा आदी भागांत मालमत्ता तसेच पाणी बिले थकविणाऱ्यांविरोधात महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या नळजोडण्या तोडून मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. मात्र, मुंब्रा भागात वसुली होत नसतानाही त्या भागात अशा प्रकारची कारवाई का करण्यात येत नाही, असा आरोप त्यांनी केला.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महापालिका प्रशासनाकडून मुंब्रा भागाकरिता भरीव तरतूद करण्यात आली आहे. मात्र, याच भागातून मालमत्ता तसेच पाणी बिलांची वसुली सर्वात कमी झाली आहे. त्यामुळे याच मुद्दय़ावरून शिवसेनेच्या सदस्यांनी एक प्रकारे महापालिका प्रशासनाला टीकेचे लक्ष्य केले. त्याचप्रमाणे कळवा-मुंब्रा भागातील राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा