छत्रपती शिवाजीमहाराजांच्या अश्वारूढ पुतळय़ाच्या सभोवताली गटार फुटून मैलामिश्रित पाणी वाहात असल्याने त्याकडे लक्ष वेधूनही प्रशासन गाफील. राहिल्याच्या निषेधार्थ महापालिका आयुक्तांच्या दालनात घुसून मैलामिश्रित पाणी टाकणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह इतर शिवसैनिकांना मारहाण केली व त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी पालिकेतील चौघा कर्मचाऱ्यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
पालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे, आयुक्तांचे स्वीयसहायक सुनील क्षीरसागर, राहुल कुलकर्णी व शिपाई सिद्राम कुर्रे अशी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, पालिकेचे कर्मचारी सिद्राम कुर्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणला व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्हय़ात शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण, विद्यार्थी सेनेचे विभागीय संघटक महेश धाराशिवकर आदी शिवसैनिक न्यायालयात हजर झाले असता त्यांना जामिनावर मुक्त करण्याचा आदेश देण्यात आला.
गेल्या ८ ऑक्टोबर रोजी पांजरापोळ चौकातील छत्रपतींच्या पुतळय़ाभोवती गटार फुटून मैलामिश्रित पाणी वाहात असल्याबद्दल पालिका आयुक्त व महापौरांना कळवूनदेखील पालिकेकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पालिका आयुक्तांच्या दालनात घुसून गोंधळ घालत मैलामिश्रित पाणी टाकले व सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करीत दहशत निर्माण केली, अशी फिर्याद सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. तर याउलट, पालिकेचे जनसंपर्क अधिकारी दंतकाळे, आयुक्तांचे स्वीय सहायक क्षीरसागर, कुलकर्णी, शिपाई कुर्रे व इतरांनी यांनी मिळून शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातून पाच हजारांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज बळजबरीने लुटला. नंतर या सर्वानी चव्हाण यांना उद्देशून, आयुक्तांच्या नादाला लागायचे नाही. अन्यथा पुन्हा अशीच गत करू, अशी धमकी दिल्याची फिर्याद चव्हाण यांनी नोंदविली होती. या प्रकरणात शहरप्रमुख चव्हाण व इतर शिवसैनिक न्यायालयात हजर झाले असता त्यांना जामीन मिळाला. दरम्यान, गुन्हय़ात होऊ नये म्हणून पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला. पालिकेचे कर्मचारी सिद्राम कुर्रे यांनी शिवसैनिकांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीला शह देण्यासाठी खोटय़ा आशयाची दरोडय़ाची फिर्याद शिवसेना शहरप्रमुखांनी दाखल केल्याचे अ‍ॅड. थोबडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. अर्जदार हे सरकारी नोकर असून त्यांना अटक झाल्यास त्यांची नोकरी जाऊ शकते. तसेच सरकारी नोकरीत असल्याने ते कोठेही पळून जाणार नाहीत व तपासात मदत करतील असे मुद्दे अ‍ॅड. थोबडे यांनी मांडले. ते ग्राहय़ धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी संबंधित पालिका कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.