पालकमंत्री असताना बबनराव पाचपुते यांनी राजकीय अस्तित्व पणाला लावून लोकसभा निवडणुकीत भाजपचे गोपीनाथ मुंडे यांना टोकाचा विरोध केला, तर भाजपला रामराम ठोकून प्रकाश सोळंके यांनीही मुंडेंचे ज्येष्ठ बंधू, जावई, पुतणे यांना राष्ट्रवादीत आणून राजकीय पातळीवर मुंडेंना जेरीस आणले. मात्र या दोन्ही मंत्र्यांना पक्ष नेतृत्वाने मंत्रिपदावरून काढल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. अपेक्षा असूनही आमदार विनायक मेटे यांची दखलही घेतली नाही. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्मक्लेषाच्या उपरतीनंतर कडव्या विराधापेक्षा सबुरीची नीती सुरू केल्यानेच मुंडेंना विरोध करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला गेला काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गडाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरुंग लावला. दोन विद्यमान आमदारांसह मुंडेंच्या अनेक सहकाऱ्यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण केल्याने पवार-मुंडे संघर्ष पेटला. मात्र, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात स्थानिक पातळीवर मुंडेंना प्रखर विरोध करून राजकीयदृष्टय़ा जेरीस आणणाऱ्या दोन विद्यमान मंत्र्यांना घरी बसवण्यात आल्याने नवीच चर्चा सुरू झाली. मागील लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री पदाची जबाबदारी बबनराव पाचपुते यांच्याकडे होती. पाच आमदार, दोन मंत्री, सर्व संस्थांवर पक्षाचे वर्चस्व असले तरी गटात विखुरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाचपुते यांनी मोट बांधून भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर आव्हान उभे केले. पाचपुते तसे मुंडेंचे मित्र पण तब्बल एक महिना तळ ठोकला. ‘मुंडे यांच्यावर कडाडून टीका केली. मुंडे निवडून आले, तरी राष्ट्रवादीच्या नवख्या उमेदवाराला सव्वा चार लाख मते मिळाली. निवडणूक प्रचारातच मुंडेंनी पाचपुतेंना विधानसभा निवडणुकीत घरी बसवू, अशी घोषणा करून संघर्ष पुकारला. त्यामुळे पाचपुते यांना त्यांच्या मतदारसंघात मुंडेंच्या विरोधातील किंमत मोजावी लागली होती. दुसरीकडे प्रकाश सोळंके यांनीही भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवर मुंडेंना प्रखर विरोध सुरू केला. बंद पडलेल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुंडेंना लक्ष्य केले. मुंडेंच्या संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल केले. माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे आजही जेलमध्येच आहेत. सोळंकेचे बंधू धैर्यशील सोळंके यांनी बँकेतील गैरव्यवहार बाहेर काढून संचालकांना हैराण केले. परळीत खा. मुंडेंचे ज्येष्ठ बंधू पंडितराव मुंडे, पुतणे धनंजय मुंडे आणि जावई मधुसूदन केंद्रे यांना थेट राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात सोळंके यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. सोळंके व मुंडे यांचा मतदारसंघ लागून असल्याने मुंडेंना त्रास देण्याची एकही संधी सोळंके यांनी सोडली नाही. महसूल राज्यमंत्री म्हणून बँकेतील गैरव्यवहारांसह अनेक संस्थांची तपासणी करण्याचे आदेश दिले. आपल्या खात्याच्या माध्यमातून जिल्हय़ात तलाठी कार्यालयाचे बांधकाम, माजलगाव येथे टेक्सटाईल पार्क मंजूर करून विकासालाही गती दिली. सर्वच पक्षाचे बहुतांशी पुढारी मुंडेंना विरोध करण्याचे धाडस करत नाहीत. मात्र सोळंके यांनी वैयक्तिक पातळीवर मुंडे यांना विरोध केला, असे असताना पाचपुते व सोळंके यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळातून काढण्यात आले. यामुळे पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. अजित पवार यांनी दुष्काळात केलेल्या वक्तव्यानंतर त्याना आत्मक्लेषाची उपरती झाली. या पार्श्वभूमीवर पवारांनी प्रखर विरोधापेक्षा सबुरीचा मार्ग निवडला. त्यामुळे पाचपुते व सोळंकेंना घरी जाण्याचे बक्षीस मिळाले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा