दुष्काळाच्या प्रश्नावर औरंगाबादेत दोन दिवस उपोषण केल्यावर खासदार गोपीनाथ मुंडे यांनी डॉक्टरांचा आराम करण्याचा सल्ला धुडकावून लावत मंगळवारी रात्रीच शिराळा (तालुका आष्टी) येथील जनावरांची छावणी गाठली. शेतकऱ्यांबरोबर सरकारी मदतीची, भविष्यातील पाणी साठवण्याच्या योजनांवर चर्चा करीत मध्यरात्री एकच्या सुमारास जेवण केले. त्यानंतर पहाटेपर्यंत शेतकऱ्यांशी चर्चा करीत तेथेच लाकडी बाजेवर मुक्काम ठोकला. सकाळची नित्य आन्हिके आटोपल्यावर शेतकऱ्यांसमवेत न्याहारी करून मुंडे यांनी दुष्काळी पाहणी दौऱ्यास सुरुवात केली.
मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीत राज्य सरकारकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप करीत मुंडे यांनी विविध मागण्यांसाठी औरंगाबादला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी उपोषण सुरू केले होते. सरकारने मुंडेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी उपोषण सोडले. मात्र, मधुमेह, रक्तदाब यामुळे मुंडेंची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला. परंतु मुंडेंनी डॉक्टरांचा सल्ला गुंडाळून ठेवत थेट दुष्काळी दौऱ्याला प्रारंभ केला.
औरंगाबादहून रात्री दहाच्या सुमारास आष्टी तालुक्यातील शिराळा येथील गुरांच्या छावणीत मुंडे दाखल झाले. सुरेश खानापुरे यांच्या उपस्थितीत जलसमृद्धी अभियानास प्रारंभ करून मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांशी चर्चा केली व दुष्काळाने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा दिला. छावणीत सरकारी नियमानुसार दिला जाणारा १५ किलो चारा पुरतो का, जनावरांबरोबर छावणीत राहात असताना घरची जबाबदारी कोण पाहतो, छावणीत जेवणाची सोय होते का, जनावरांचे भागले, पण हाताला काम मिळते का, रोजगार हमीवर वेळेवर पैसे मिळतात का, पाण्याची व्यवस्था काय आहे, असे प्रश्न विचारत शेतकऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली.
बहुतांशी शेतकऱ्यांनी सरकारकडून जनावरांना मिळणारा १५ किलो चारा पुरत नाही. उसाचाच चारा असल्यामुळे त्यात कस नसल्याने सहा दिवसांतून मिळणाऱ्या तीन किलो पेंढीऐवजी दरदिवस एक किलो पेंढ मिळावी, त्यामुळे जनावरांना बळ येईल, याकडे लक्ष वेधले. दुष्काळी स्थितीत हतबल न होता धैर्याने तोंड देण्याचा आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न मुंडेंनी शेतकऱ्यांमध्ये केला. बुधवारी पहाटे साडेतीनपर्यंत शेतकऱ्यांनी सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपाची गाऱ्हाणी मुंडेंजवळ मांडली. त्यानंतर छावणीतच मुंडे यांनी लाकडी बाजेवर विश्रांती घेतली.
सकाळी आठ वाजता उठून छावणीतच शेतकऱ्यांबरोबर न्याहारी करून आंधळय़ाच्या वाडीकडे रवाना झाले. रोजगार हमी योजनेच्या मजुरांशी चर्चा केल्यानंतर तीन महिन्यांपासून पैसेच मिळत नसल्याचे चित्र समोर आले. मुंडेंनी तात्काळ संबंधितांना उद्याच हे पैसे देण्याचे आदेश बजावले. हरिनारायण आष्टा येथील ग्रामस्थांशी चर्चा करून दुपारी चुंभळी येथील छावणीला मुंडेंनी भेट दिली. पाटोदा येथे दुष्काळी स्थितीची पाहणी केली.

Story img Loader