ठाणे परिवहन सभापतिपदाच्या निवडणुकीत पराभव जिव्हारी लागल्यामुळे शिवसेना-भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांना मारहाण करीत त्यांच्या महापालिकेतील कार्यालयाची तोडफोड केली. त्याआधीही मुख्यालय परिसरात राडा करीत ठाणेकरांना वेठीस धरले गेले. शहराचे प्रशासकीय पालकत्व भूषविणाऱ्या महापालिका मुख्यालयात हवा तसा राडा करणाऱ्या या राडेबाजांना अटकेनंतर मात्र महापालिका म्हणजे समाजसेवेचे देवालय असल्याचा साक्षात्कार झाला आहे. पोलिसांनी या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळताच काही हल्लेखोरांनी मुख्यालय आमच्यासाठी देवालयाप्रमाणे पवित्र असल्याचा खुलासा करताच पोलीसही अचंबित झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, जामिनावर सुटका होऊन बाहेर पडलेल्या यांपैकी काही हल्लेखोरांनी पत्रकारांना दूरध्वनी करून देवालयाची कॅसेट सुरूच ठेवली होती. त्यामुळे पत्रकार आणि पोलिसांना चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीची आठवण येऊ लागली आहे.
ठाणे परिवहन सभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेचे शैलेश भगत यांना गळाला लावत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या वेळीही शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिसरात तसेच नौपाडा पोलीस ठाण्याच्या आवारात धुडगूस घातला होता. त्याविषयी ठाणेकरांमधून नाराजीचा सूर उमटू लागला होता. सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे सदस्य अजय जोशी यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार भगत यांना मदत केल्यामुळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश कदम यांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यातूनच अजय जोशी यांना मिलिंद पाटणकरांची फूस असल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाटणकर यांना मारहाण केली होती. तसेच त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. महापालिकेतील या राडय़ाचे दर्शन घडविणाऱ्या नेत्यांविषयी ठाणेकरांमधून तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सरकारी मालमत्तेचे नुकसान तसेच जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे जगदीश थोरात, सतीश पवार, भाजपचे मुकेश शेलार, रमेश बोवले आणि ओमकार नाईक या पाच जणांना गुरुवारी अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा