झोपडपट्टय़ांमधील अस्वच्छता, तुंबणाऱ्या मल-सांडपाणी वाहिन्या, डासांचा प्रादुर्भाव, साथीच्या आजारांच्या प्रादुर्भावाची शक्यता, जलजन्य आजारांना कारणीभूत ठरणारे अनधिकृत फेरीवाले या संदर्भात आदेश देऊनही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतापलेले पालिका आयुक्त अजय मेहता पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कडाडले. विभागात फिरून नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष द्या, कार्यालयात दिसलात तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा सज्जड दम आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पालिकेच्या कारभाराचा आढावा घेतला होता. त्या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांची शनिवारी तातडीची बैठक बोलावली होती. स्वच्छता, दूषित पाणीपुरवठा, आरोग्य, रस्ते-पदपथावरील खड्डे, फेरीवाले, नालेसफाई, मलनि:सारण सफाई, छाटलेल्या वृक्षांच्या रस्त्यालगत पडलेल्या फांद्या आदी विषयांवरून अजय मेहता यांनी उपायुक्त, साहाय्यक आयुक्त आणि खातेप्रमुखांची कानउघाडणी केली.
पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील अधिकाऱ्यांकडून अनेक वेळा विविध कामांबाबतचे संक्षिप्त स्वरूपात अहवाल मागविले जातात. अहवाल कार्यालयात असल्याची सबब पुढे करून ते वेळेवर पाठविले जात नाहीत. परिणामी निर्णय प्रक्रियेत विलंब होतो. त्यामुळे यापुढे मागविलेले अहवाल तात्काळ पाठवावे. ते घेऊन मुख्यालयात येण्याची आवश्यकता नाही. ई-मेल, एसएमएस अथवा व्हॉटस् अ‍ॅपद्वारे ते तात्काळ पाठवून द्यावेत, असे आदेश अजय मेहता यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
पाऊस थांबल्यामुळे साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभाग आणि कीटक नियंत्रण विभागाने काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसण्याऐवजी विभागात फिरून नागरी सुविधांचा आढावा घ्यावा. एखादा अधिकारी कार्यालयात सापडला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करताना अजय मेहता यांचा रोख विभाग कार्यालयांमधील वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि कीटक नियंत्रण अधिकाऱ्यांकडे रोख होता. डेंग्यु, हिवतापाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या घरी आणि आसपास प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, त्याच भागात पुन्हा साथीच्या आजारांनी डोके वर काढले तर संबंधित अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी जून महिन्यात कोणत्या विभागाला भेटी दिल्या, तेथे काय आढळले, समस्यांवर कोणत्या उपाययोजना केल्या आदींचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेशही आयुक्तांनी सर्वाना दिले. आयुक्तांच्या कडक भूमिकेमुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

Story img Loader