ठाण्यातील व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कराचे दर सरसकट दोन टक्के करण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवून त्यानुसार कराचा भारणा करण्यास सुरुवात केली होती. मात्र, ठरावीक रक्कमेचा भारणा मुदतीत करण्यात आला नसल्यामुळे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी हा प्रस्ताव तुर्तास मागे घेतला. त्यामुळे ठाण्यातील व्यापारी चांगलेच अडचणीत आले असून त्यांना शासनाच्या दरसूचीनुसारच स्थानिक संस्था कराचा भारणा करावा लागणार आहे. तसेच यापूर्वी शासनाच्या दरसूचीपेक्षा कमी म्हणजेच दोन टक्के दराने कराचा भारणा करणाऱ्या व्यापाऱ्यांना फरकाची रक्कमही आता भरावी लागणार असून त्यासाठी महापालिकेने २० डिसेंबपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे व्यापार उद्योग महासंघ (ठाम) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी शासनाच्या मंजूर दराने स्थानिक संस्था कराचा भारणा केलेला नाही, अशा व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था करातील फरकाची रक्कम भरावी, असे आवाहन गुप्ता यांनी पदाधिकाऱ्यांना केले. तसेच येत्या २० डिसेंबपर्यंत फरकाची रक्कम भरली नाही तर देय रक्कमेवर दोन टक्के दराने व्याज आकरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीत स्थानिक संस्था कराचे दर सरसकट दोन टक्के करण्यासंबंधीची मागणी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा केली. मात्र, ही मागणी आयुक्त गुप्ता यांनी फेटाळून लावली. सध्या स्थानिक संस्था कराअंतर्गत प्राप्त महसुलाचा विचार करता व सध्याचे मंजूर दर सरसकट असल्याने दोन टक्के दर वसूल करणे शक्य होणार नाही, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. आयुक्त गुप्ता यांच्या भूमिकेमुळे व्यापारी वर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. सध्याचे स्थानिक संस्था कराचे दर योग्य व सारखे आहेत. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षांसाठी या कराचे दर निश्चित करताना एकसारखे दर व दर किती असावा, याबाबतचा प्रस्ताव यावर्षी जमा झालेला महसूल लक्षात घेऊन शासनाकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासनही गुप्ता यांनी या बैठकीत दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा