स्थायी समिती सदस्यांच्या निवडणुकीनंतर झालेल्या महापालिकेच्या सभेत शहराच्या विविध विकास कामांबाबत आयुक्त श्याम वर्धने यांच्यावर नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना अडचणीत आणले. ठोस माहितीचा अभाव असल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे देता देता आयुक्तांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही चांगलाच घाम फुटला. जवळपास एक तास झालेल्या या चर्चेत आयुक्तांजवळ काही विषयाच्या संदर्भात माहिती अपुरी असल्यामुळे ते विषय प्रलंबित ठेवून त्यावर चर्चा करणे त्यांनी टाळले. चर्चेसाठी एक तास कमी पडल्यामुळे १८ पैकी केवळ ९ प्रश्नांवर आयुक्तांशी चर्चा होऊ शकली.
नव्या महापालिका कायद्यानुसार कुठल्याही मुद्यावर लिखित प्रश्नाद्वारे प्रशासनाला जाब विचारण्याची मुभा असल्यामुळे सात सदस्यांनी सात दिवस आधीच महापालिका आयुक्तांकडे विकास कामासंदर्भातील आणि आयुक्तांच्या कार्यशैलीबाबत १८ प्रश्न लेखी स्वरूपात दिले होते. महापालिकेची सभा सुरू झाल्यावर सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, सुधाकर कोहळे, सतीश होले, राजू नागूलवार, किशोर गजभिये, दयाशंकर तिवारी आदी सदस्यांनी एक एक करीत आयुक्तांवर प्रश्नांचा मारा केला. आयुक्त संबंधित प्रश्नांचे उत्तरे देत असताना त्यातून अनेक उपप्रश्न उपस्थित करून आयुक्तांना अनेकदा अडचणीत आणण्याची खेळी खेळण्यात आली. आयुक्ताजवळ अपुरी माहिती असल्यामुळे संबंधीत विषयाची चौकशी करण्यात येईल, पुढील सभेत माहिती देण्यात येईल अशी उत्तरे देऊन आयुक्तांनी वेळ मारून नेली.
प्रवीण दटके यांनी नाईक तलावातील परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन, कनिष्ठ पदाच्या अधिकाऱ्यांना आदेश काढण्याचे अधिकार आहेत काय? संगणक ऑपरेटर्सच्या रिक्त पदासंदर्भात, पेंच टप्पा ४ आणि जेएनयूआरएमअंतर्गत जलकुंभाच्या संदर्भात आयुक्तांना विचारणा केली. त्यापैकी आयुक्तांनी काही प्रश्नांच्या बाबतीत तांत्रिक अडचणी सांगितल्या तर काही प्रश्नांवर संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. नाईक तलावाच्या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसनबाबत संबंधित आणि ऑपरेटरची पदासंदर्भात ताबडतोब कारवाई करून ती पदे भरण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
संदीप सहारे यांनी उत्पन्न व विकास कामाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर आयुक्तांनी आकडेवारी दिली मात्र, त्या आकडेवारीने सहारे यांचे समाधान झाले नाही. मालमत्ता आणि जकात कर वाढविण्यासंदर्भात प्रशासनाने प्रयत्न केले असून गेल्यावर्षीत तुलनेत यावर्षी १५ टक्क्यांनी उत्पन्न वाढले असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
महापालिकेचे प्रत्येक विभागाचे अंकेक्षण, बाजाराचे उत्पन्न, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून निविदा न काढता फर्निचरची केलेली विक्री आदी प्रश्न सहारे यांनी उपस्थित केले मात्र त्यावर आयुक्तांना सहारे यांचे समाधान करता आले नाही. स्थापत्य अग्निशमन विभागातील सेवा ज्येष्ठतानुसार पदाची निर्मिती आणि आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्न राजू नागुलवार यांनी उपस्थित केले असता त्यावर आयुक्तांनी दोन महिन्यात पदे भरण्याचे आश्वासन दिले. किशोर गजभिये, दयाशंकर तिवारी यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावरही आयुक्तांची उत्तरे देताना पुरेवाट झाली.
चर्चेसाठी केवळ एक तास ठेवण्यात आल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आजच्या सभेतील चर्चेत १८ प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र केवळ नऊ प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तर संदीप जोशी, अविनाश ठाकरे, सुरेश जग्यासी, विकास ठाकरे, किशोर डोरले यांचे प्रश्न पुढच्या सभेपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आले.

Story img Loader