शहर परिसरात बोकाळलेल्या बेशिस्त वाहतुकीला वाहनधारक, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दोषी धरले जाते, तथापि, चांगले रस्ते आणि वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या महापालिका प्रशासनाची भूमिका निर्धोक वाहतुकीसाठी महत्वाची ठरू शकते. रस्ता सुरक्षा समितीने याच मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. या विषयात शहरात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
शहरातील आग्रा रस्त्यावरील मुख्य बाजारपेठेत खूश जैन या शाळकरी विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वच यंत्रणा जाग्या झाल्या आहेत. शिक्षक-पालक संघ, रस्ता सुरक्षा समिती, शाळेचे व्यवस्थापन, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, सामाजिक संस्था आणि संघटना, राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्ते व नेतेही निरनिराळ्या उपाययोजना आखत आहेत. शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या अ‍ॅटो रिक्षा चालक-मालक संघ संघटनांनीही या भीषण अपघातानंतर एका वाहनातून कमीत-कमी विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचा निर्णय घेतला. विविध शाळांमध्ये परिवहन समित्यांची स्थापना होण्यास सुरूवात झाली आहे. अशा परिस्थितीत धुळ्यातील रस्ता सुरक्षा समितीने महापालिका व प्रादेशिक परिवहन विभाग वाहतूक व्यवस्थेत किती महत्वाची भूमिका निभावू शकतो, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
शहरात किमान दोन ते अडीच लाख वाहने असून त्यांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंद आहे. याची महापालिकेला माहिती नाही असे म्हणता येणार नाही. वाहनांची संख्या आणि शहरांतर्गत रस्त्यांची रुंदी पाहिली तर संख्येचा आणि जागेचा कुठेही ताळमेळ बसत नाही, याचवेळी महापालिकेने या वाहनांसाठी अधिकृत अशी पार्किंग व्यवस्थाही कुठे केलेली नाही. वाढणारी वाहन संख्या आणि त्यासाठी अपुरी सुविधा अशा स्थितीत किमान सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. अन्यथा प्रादेशिक परिवहन विभागाने नव्या वाहनांची नोंदणी करू नये असे रस्ता सुरक्षा समितीने म्हटले आहे.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे १७ जुलै २००९ मध्ये महापालिकेने शहरातील चारही दिशेला वाहने पार्किंगसाठी सात ठिकाणी मंजुरी दिली होती. त्यात महाजन हायस्कूल समोरील बाजारासाठी आरक्षित जागा (देवपूर), ‘एसएसव्हीपीएस’ महाविद्यालयासमोरील नवरंग जलकुंभासमोरील मैदान, भांग्या मारोती व्यायामशाळेजवळील पालिका शाळेचे मैदान, गरूड हायस्कूलचे मैदान, बारा पत्थर लगतच्या शाळा क्रमांक १५ चे मैदान आणि साक्री रस्त्यालगतच्या शाळा क्रमांक १४ चे मैदान यांचा त्यात समावेश होता. परंतु, आजतागायत त्या अनुषंगाने कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.
वाहनतळांची व्यवस्था नसल्याने चालक मनमानी पध्दतीने आपली वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. अनेकदा त्यामुळे अपघातांची शक्यता बळावते. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे गरजेचे आहे. अन्यथा पहिल्या पानावरून पुढे.. हा प्रकार भविष्यातही कायम राहण्याचा धोका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा