* दुसऱ्या दिवशीही दुकाने व घरांमधून पाणी काढण्याचे काम
* तुंबलेल्या गटारी व अतिक्रमणांमुळे ठिकठिकाणी तलावाचे स्वरूप
नैसर्गिकपणे पाणी वाहून नेणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी झालेली अतिक्रमणे आणि तुंबलेल्या गटारी, याची परिणती पहिल्याच पावसात शहरातील अनेक प्रमुख रस्ते व परिसर पाण्याखाली जाण्यात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही प्रमुख रस्त्यांवर दुभाजकामुळे एका बाजूस अक्षरश: नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. खुद्द महापालिकेच्या मुख्यालयासह गंगापूररोड, उंटवाडी, नाशिकरोड, सराफ बाजार, गणेशवाडी, सिडको आदी भागातील दुकाने आणि घरांमध्ये शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सलग दुसऱ्या कठोर प्रयत्न करावे लागले. गुरूवारी रात्री अवघ्या तासाभराच्या काळातच पावसाने अक्षरश: दाणादाण उडविली असताना पालिका यंत्रणेने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे सिद्ध झाले. पुढील काळात सलग काही तास पाऊस झाल्यास काही वर्षांपूर्वी मुंबईकरांनी अनुभविलेल्या जलप्रपाताचे संकट
वास्तविक, पावसाचे पाणी थेट नदीपात्रात वाहून नेण्यासाठी महापालिकेने पावसाळी गटार योजनेवर कोटय़वधींचा निधी खर्च केला आहे. इतका निधी खर्च होऊनही पावसाचे पाणी काही केल्या वाहून जाऊ शकले नाहीच, शिवाय याआधी कधी अनुभवयास न येणाऱ्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेक गटारी तुंबलेल्या असल्याने पाणी सरळ रस्त्यावरून वाहत होते. पावसाळी गटार आणि जे थोडेफार नाले शिल्लक आहेत, त्यांची साफसफाई झाली नसल्याने गटारी व नाल्यांमधून पाणी बाहेर येत होते. नैसर्गिक नाल्यावर झालेली विविध स्वरूपाची अतिक्रमणे त्यास तितकीच जबाबदार आहेत.
नाले व ओहोळ बुजविण्याची किमया यापूर्वी झाली असल्याने रस्त्या-रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहिले. पाच वर्षांपूर्वी शहराला महापुराने धडक दिल्यानंतर शहरात जी बिकट स्थिती निर्माण झाली होती, त्याची अनुभूती शहरवासीयांना तासाभराच्या पावसाने आली. त्यावेळची परिस्थिती एका विशिष्ट भागात होती, यावेळी मात्र संपूर्ण शहरातच अशी परिस्थिती होती. सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली असताना पालिकेचा आपत्ती निवारण विभागाचा कुठे मागमूसही दिसला नाही. दुसऱ्या दिवशी ही यंत्रणा खडबडून जागी झाली. ज्या दुकानांमध्ये पाणी शिरले ते पंपाच्या मदतीने बाहेर उपसण्याचे काम यंत्रणेकडून सुरू झाले. पालिकेला पावसाळापूर्व करावयाच्या कामांचा विसर पडल्याचे या पावसाने दाखवून दिले. काही वर्षांपूर्वी मिठी नदीच्या पाण्याने मुंबईत जलप्रपात घडविला होता. पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गात असे अडथळे निर्माण करण्याची प्रक्रिया कायम राहिल्यास नाशिककरही तशा संकटातून सुटण्याची शक्यता नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा