धुळवडीच्या निमित्ताने होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी ‘पाणी बचाव’ मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे यंदाची होळी ‘कोरडी’ राहील, असे गृहित धरले जात आहे. महाराष्ट्रातील अभूतपर्व दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शक्यतो वनस्पतींपासून तयार केलेले रंग लावून होळी साजरी करण्याचे आवाहन अनेक मान्यवरांनी केले आहे. कस्तुरचंद पार्क मैदानावर स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या होलीसत्संग कार्यक्रमादरम्यान लाखो लीटर पाण्याची नासाडी झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनही सावध झाले असून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूर शहरात दरवर्षी होळीच्या निमित्ताने लाखो लीटर पाणी उधळले जाते. पिचकाऱ्यांमधून रंगीत पाणी आणि पाण्याचे फुगे फोडून पाण्याची वारेमाप नासाडी केली जाते. राज्याच्या एका भागातील जनता थेंब थेंब पाण्यासाठी ५० किलोमीटर पायपीट करीत असताना केवळ पाणी मुबलक आहे म्हणून उधळणे टाळावे, असे आवाहन पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले आहे.
महापौर अनिल सोले यांनीही केवळ रंगांची आणि गुलालाची उधळण करून पाणी बचतीला हातभार लावण्याची हाळी दिली आहे. अर्थराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनाही पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कडक कारवाईची अपेक्षा असून येत्या तीन महिन्यापर्यंत पाण्याचे साठे पुरवावे लागणार असल्याने जनतेने शक्यतो कोरडय़ा होळीतून सणाचा आनंद लुटावा, असे आवाहन केले आहे. माजी महापौर अटलबहादूर सिंग यांनीही पाणी निष्कारण वाया घालविण्याच्या प्रवृत्तीला विरोध दर्शविला असून सजग नागरिक असे करणार नाहीत, याबद्दल खात्री व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या भीषणतेची जाणीव ठेवून आणि सातत्याने कमी होत झालेल्या जलसाठय़ांचे भान ठेवून होळीचा सण शक्यतो पाणी न वापरता साजरा करण्यासाठी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरीही आता आक्रमक झाले आहेत. लाखो नागरिकांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा असताना उत्साहाला आवर घालण्याची गरज आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव अतुल लोंढे यांनी एक पत्रकच जारी केले असून पाण्याचे महत्त्व आताच ओळखा अन्यथा भविष्यात पश्चातापाची वेळ येईल, असा इशारा दिला आहे. होळी पाण्यातून रंग उधळून खेळण्याचे दिवस आता संपले आहेत कारण पाणीसाठे झपाटय़ाने कमी होऊ लागले आहेत. मनुष्याला आणि वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, असे आवाहन लोंढे यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनीही पाण्याच्या वापरापेक्षा गुलाल उधळून होळी खेळण्याची हाक दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा