अर्धनागरीकरण झालेल्या ५५ गावांपुढे दोनच पर्याय
दोन वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील ७६.९९ टक्के लोकसंख्या शहरी भागात राहत असली तरी प्रत्यक्षात केवळ नावापुरते ‘गाव’ उरलेल्या अर्धशहरी भागातील लोकवस्त्या गृहीत धरल्या तर हे प्रमाण ८० टक्क्य़ांहून अधिक होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अशा प्रकारे शहरे झालेली अथवा होण्याच्या मार्गावर असलेली सर्वाधिक गावे ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडी तालुक्यांत आहेत. अतिशय अर्निबध अवस्थेत वाढणाऱ्या या गावांना बकाल वस्त्यांची अवकळा येऊ लागली असून ते रोखण्यासाठी महानगरपालिका अथवा तीन पालिका स्थापन करण्याव्यतिरिक्त नगरविकास खात्यापुढे अन्य कोणताही पर्याय उरलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या गावांमध्ये सुविधा पुरविण्यात स्थानिक ग्रामपंचायती सपशेल अपयशी ठरल्याने या भागासाठी नगरपालिका अथवा महानगरपालिका स्थापन करण्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून शासन स्तरावर चाचपणी सुरू आहे. ‘ग्रामपंचायत म्हणजे स्वातंत्र्य आणि महापालिका म्हणजे पारतंत्र्य’ अशी टोकाची भूमिका घेऊन या परिसरातील बहुतेक गावांनी महापालिका प्रशासनास विरोध केला. त्यापैकी बहुतेक गावे आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यशस्वी ठरली असली तरी या भागाच्या विकासावर ती नियंत्रण ठेवू शकली नाहीत. त्यामुळे गेल्या दशकभरात ग्रामपंचायतींनी स्वतंत्र राहून काय मिळविले याचा ताळेबंद मांडला असता हाती फारसे काही लागत नाही. त्यामुळे गावांच्या या अर्निबध शहरीकरणाला शिस्त लावण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची आवश्यकता नियोजन तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार या परिसरात तीन नगरपालिका अथवा एक महापालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. अंबरनाथ, कल्याण आणि ठाणे तालुक्यातील ५५ गावांचा या अर्धशहरी पट्टय़ात समावेश होतो. विशेष म्हणजे या सर्व गावांनी अनुक्रमे कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध केला आहे. त्यापैकी कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २६, तर नवी मुंबई महापालिकेतून १४ गावे वगळण्यात आली आहेत, तर ठाणे महापालिकेतून १५ गावे वगळण्याचा ठराव दहा वर्षांपूर्वीच महासभेत बहुमताने संमत करण्यात आला आहे. या सर्व गावांची २००१ ची लोकसंख्या १ लाख ८९ हजार ६०५ आहे. मात्र गेल्या बारा वर्षांत सर्वाधिक नागरीकरण याच भागात झाल्याने सध्या या परिसराची लोकसंख्या चार लाखांहून अधिक आहे.
महानगरांचा शेजार
या सर्व गावांलगत नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर ही शहरे असल्याने त्यांचा झपाटय़ाने विस्तार होत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरपालिकांची एकत्रित लोकसंख्या ४६ लाख ९१ हजार ६६७ इतकी आहे. म्हणजे ठाणे जिल्ह्य़ाच्या एकूण लोकसंख्येच्या तब्बल चाळीस टक्के लोकसंख्या फक्त या चार महापालिका क्षेत्रांतच आहे. नव्या प्रस्तावित महापालिकेतील सर्व ५५ गावांना या महानगरांचा शेजार असल्याने त्यांचेही झपाटय़ाने नागरीकरण होत आहे. त्यामुळे या परिसरात एकतर जिल्ह्य़ातील आठवी महापालिका अथवा तीन नगरपालिका स्थापन करण्याशिवाय नगरविकास खात्यापुढे अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.
नवव्या महापालिकेचेही वेध
अंबरनाथ-बदलापूर या सध्या मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात झपाटय़ाने विकसित होत असलेल्या शहरांची लोकसंख्या २०११ च्या लोकसंख्येनुसार अनुक्रमे २ लाख ५४ हजार आणि एक लाख ७५ हजार आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे तसेच परिसरातील गावे मिळून आणखी एक नववी महापालिका ठाणे जिल्ह्य़ात कार्यान्वित होऊ शकते.