उरणमधील १६ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घर खाली करण्याच्या नोटिसा बजावण्याचे प्रामाणिक कर्तव्य उरण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चोख बजावले. यात दुर्घटना घडल्यास तेथील रहिवाशी स्वत: जबाबदार राहतील, असे नियमानुसार नमूद करण्यात आले आहे. मात्र यामुळे गेली अनेक वर्षे नगरपालिकेचा नियमित कर भरणाऱ्या या रहिवाशांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने स्थलांतराचा मोठा पेच त्यांच्या समोर असल्याने अखेर जीव मुठीत घेऊन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
उरण नगरपालिकेने शहरातील एकूण सोळा जीर्णावस्थेतील इमारतींना धोकादायक ठरवून रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत. यापैकी शांती निवास या केवळ एकाच इमारतीतील रहिवाशांनी इमारत खाली केली असून उर्वरित इमारतीतील रहिवाशी अशा धोकादायक इमारतीत राहात आहेत. यापैकी शहरातील वाणी आळीमधील एका धोकादायक यादीतील इमारतीचा छत कोसळल्याने त्या ठिकाणी असलेल्या एक मुलगा गंभीर जखमी झाला होता, तर दुसऱ्या एका इमारतीचा जिना कोसळल्याची घटना घडली होती.      
पावसाळ्यापूर्वी उरण नगरपालिकेने परिसरातील उरण बाजारपेठ, मोहल्ला, मोरा तसेच कोटनाका येथील सोळा इमारतींना नगरपालिका कायद्याच्या १९५ कलमानुसार धोकादायक इमारतीतील घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावलेल्या असल्याची माहिती नगरपालिकेचे या विभागातील अधिकारी डी. जे.  पेडणेकर यांनी दिली आहे. या नोटिसा इमारतीचे मालक तसेच इमारतीत भाडय़ाने राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात आलेल्या आहेत. या नोटिसीनुसार पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून अपघात, नुकसान किंवा जीवितहानी झाल्यास नगरपालिका जबाबदार राहणार नाही, असे नमूद करण्यात आलेले आहेत. तसेच उरण नगरपालिकेच्या वतीने ज्या इमारतीतील भाडेकरूंना पर्यायी जागा उपलब्ध नसेल त्यांच्यासाठी नगरपालिकेच्या जागेत तात्पुरती व्यवस्था करण्याचीही तयारी उरण नगरपालिकेने दर्शविलेली आहे. धोकादायक इमारतीतील मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे अनेक इमारतींतील रहिवाशी अशा धोकादायक इमारतीत जीव मुठीत घेऊन राहात आहेत.
अशा इमारतीत सध्याच्या जोरदार पावसामुळे अपघाताची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन या इमारतींवर नजर ठेवून आहे. तसेच शक्य असतील त्या इमारती खाली करून धोका टाळण्याचा प्रयत्न नगरपालिका कर्मचारी करीत असल्याची माहिती नगरपालिका सूत्रांनी दिली आहे.  

Story img Loader